गृहप्रकल्पाशेजारी भंगाराचा ढीग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

मोशी- मोशी येथील इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या रिव्हर रेसिडेन्सी गृहप्रकल्पाच्या शेजारी भंगार व्यावसायिक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य टाकत आहेत. हा संपूर्ण कचरा रिव्हर रेसिडेन्सीच्या तळ्यामध्ये टाकण्याचा मानस असल्याने याचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याचा तसेच यामळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिक विजय सूर्यवंशी म्हणाले, रिव्हर रेसिडेन्सीच्या बाजूला सोसायटीचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आहे. यासाठी सोसायटीकडून एका नैसर्गिक तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.

पावसाळ्यात सोसायटीमध्ये पडणारे पावसाचे पाणी या तळ्यात साचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून स्थानिक भंगार व्यावसायिक व स्थानिक पदाधिकारी यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात कचरा आणि भंगार या तळ्याच्या बाजूला टाकले जात आहे.मोठ्या प्रमाणात या कच-याचे ढीग लावण्यात आले असून हा संपूर्ण कचरा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या तळ्यात टाकण्याचा स्थानिक पदाधिका-यांचा संकल्प आहे. रिव्हर रेसिडेन्सी पासून एक 18 मीटर रुंदीचा डीपी रोड जाणार आहे. या रस्त्यासाठी हे तळे बुजविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र या रस्त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तरीही मान्यतेपूर्वीच ही उठाठेव सुरु केली आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न यामुळे मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो. कच-यामुळे परिसरात दुर्गंधी वाढली आहे. नैसर्गिक स्रोत बुजविल्यामुळे याचा इंद्रायणी नदीवर देखील मोठा परिणाम होणार असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले.