नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आता मोदी सरकार 2 मध्ये देशाचे नवे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच ते कामाला लागले आहे. गृहमंत्री बनताच त्यांनी बैठका सुरु केल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या ४ दिवसात काश्मीरच्या मुद्द्यावर २ वेळा बैठक घेतली आहे. अमित शहा यांचा गृहमंत्री झाल्यानंतर आज मंगळवारी चौथा दिवस आहे.
अमित शहा यांनी ३१ मे रोजी पदभार सांभाळला. त्यांनी १ जूनला गृह मंत्रालय संबंधित विविध मुद्द्यावर प्रेजेंटेशन घेतले. ३ जूनला त्यांनी अंतर्गत सुरक्षेवर बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्यासह आईबी चीफ आणि रॉ चीफ देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आज अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर आणखी एक महत्त्वाची बैठक घेतली. गृह सचिव, काश्मीरचे अतिरिक्त सचिव आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गृहमंत्री यांनी राज्यातील विकास आणि त्यासंबंधित योजनांची माहिती घेतली.