नंदुरबार (रविंद्र चव्हाण) । लक्षवेधीची धास्ती घेवून दोन दिवसांपासून कारवाईचा आव आणू पाहणा़र्या नंदुरबार पोलीस दलाला खुद्द गृहराज्यमंत्र्यांनी चपराक दिली आहे. नंदुरबारातील अवैध धंद्याबाबत आमदार चंद्रकात रघुवंशी यांनी आज उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अवैध धंद्यावर लगाम लावण्यासाठी स्वतः नंदुरबारत बैठक घेणार असल्याची घोषणा केल्याने नंदुरबार पोलीस दलाची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, या बैठकीला सर्व आमदारांना बोलाविण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
गुन्हेगारी वाढल्याचा आरोप
शहिदांचे शहर म्हणुन ओळखल्या जाणार्या नंदुरबार मध्ये अवैध धंद्याबरोबर गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप विधान परिषदेचे सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातुन विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. या अवैध धंद्यांकडे पोलीस यंत्रनेचे साफ दुर्लक्ष होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याची गंभीर दखल घेत राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या तक्रांरीवर निराकरण करण्यासाठी नंदुरबार येथे बैठक घेण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
आता कारवाईचा सपाटा
या बैठकीत नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांनाही बोलवले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासुन विधान परिषदेत गाजत असलेला नंदुरबार येथील अवैध धंद्याचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. याची धास्ती घेत नंदुरबार पोलिसांनी थातुरमातुर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षकांच्या निष्क्रीयतेमुळे पोलीस दलाची इब्रत चव्हाट्यावर आल्याने आता हे अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्यासाठी खुद्द पोलीस अधिक्षक संजय पाटील मैदाणात उतरणार असल्याचे त्यानी जनशक्तीशी बोलतांना सांगीतले आहे.
नियंत्रण कमी
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे. मात्र अवैध धंद्यांवर ज्या पोलीस अधिकार्यांचे नियंत्रन असायला हवे ते दिसत नाही. हे माझ्या लक्षात आले आहे. म्हणुन मी स्वत आता लक्ष घालुन दारु, सट्टा आदि प्रकारच्या अवैद्य धंदे बंद करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अशी माहीत पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी जनशक्तीशी बोलतांना दिली.
150 मोटारसायकल चोरीस
नंदुरबार शहरातील अवैध धंदे बंद झाल्यास जवळपास 90 टक्के प्रश्न सुटतील असा विश्वास आमदार रघुवंशी यांनी व्यक्त केला. शहरातून वर्षभरात 150 मोटारसायकल चोरीस गेली आहे. जशी मुंबईला फॅशन स्ट्रीट आहे तसे नंदुरबारला अवैध धंद्याचे स्ट्रीट असल्याचे आमदार रघुवंशी यांनी सांगितले. बैठकीत सगळे पुरावे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बाजारात शेती उत्पादन विक्रीस घेऊन जात असतांना रस्त्यात त्यांना लुटले जाते. यावर निर्बंध लादण्याची मागणी आमदार रघुवंशी यांनी
केली.