मुंबई : मुंबईच्या भायखळा कारागृहामध्ये मंजुळा शेट्यें या महिला कैद्याची निर्घृण हत्या करण्यात आली. कारागृह प्रशासनातील भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यामुळेच त्यांची हत्या घडवून आणली गेल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केला आहे.
पारदर्शक कारभाराची तळी उचलणाऱ्या सरकारने आता या खात्याचे संबंधित गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचा राजीनामा घ्यावा तसेच या हत्येसाठी कारणीभूत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा तसेच महिला न्यायाधिशाची नेमणुक करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. कारागृहातील कैद्याना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाच्या साहित्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची बाब मंजुळा शेट्ये यांनी उघड केली होती. त्यातूनच दोन अंडी व पाच पावांचा हिशोब लागत नसल्याच्या किरकोळ कारणावरून कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत मंजुळाताईंचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचे वाघ यांनी सांगितले.
मंजुळा शेट्ये यांच्या हत्येनंतर कारागृहामधील इतर महिला कैद्यांनी कारागृहाच्या छातावर जाऊन आंदोलन केले होते. कारागृहाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतीमधील लोकांनी याचे व्हिडियो शुटिंग केल्यामुळेच हे आंदोलन सर्वासमोर आलेच शिवाय या आंदोलनामुळे या प्रकरणातील सत्यही बाहेर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.