मुंबई । शहरात 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांची गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी आज भेट घेतली. 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात प्राणांची बाजी लावून अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडणार्या शहीद तुकाराम गोपाळ ओंबळे यांच्या परिवाराला भेट देवून पाटील यांनी कुटुंबाशी संवाद साधला. प्रशासनाकडून सर्व सुखसुविधा वेळेवर पुरविल्या जातात की नाही, तसेच काही अडी-अडचणी आहेत का याबद्दल विचारणा केली. तसेच शहीद तुकाराम ओंबळे यांच्या मुंबईतील स्मारकास भेट दिली. यावेळी ओंबळे यांच्या कुटुंबियांना प्रशासनाच्या सहाय्याने आवश्यक ती मदत करणार असल्याची ग्वाही देखील गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिली.
सर्वच पोलीस दलातील शहीदांचा आम्हाला अभिमान
रविवारी 26 नोव्हेंबर 2017 रोजी या दहशतवादी हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे आज मुंबई शहरात सुरक्षेच्या दृष्टीने काय काय सुविधा उपलब्ध आहेत, हे पाहण्यासाठी डॉ. रणजीत पाटील यांनी एटीएस कार्यालयाची पाहणी यावेळी केली. मुंबई शहराची सुरक्षा मुंबई मधील पोलीस किती मेहनतीने दिवस रात्र काम करतात. मुंबई हे 24 तास धावणारे शहर आहे. काहीही झाले तरी शहरात पुन्हा नवीन दिवसाबरोबर लोक धावायला सुरुवात करतात, हे कौतुकास्पद आणि स्फूर्ती देणारे आहे असेही पाटील यावेळी म्हणाले. त्याच बरोबर ओंबळे आणि त्यांच्यासह शहीद झालेल्या सर्वच पोलीस दलातील शहीदांचा आम्हाला अभिमान आहे. सरकारला त्यांच्या बलिदानाची आजही आठवण आहे.
देश कायम ऋणी असेल
शहीद तुकाराम ओंबळेंचे बलिदान कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल हा देश कायम ऋणी असेल. त्यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी आपल्यावर आहे, हे भान ठेवून आज त्यांच्या वरळीच्या घरी जाऊन भेट दिल्याचे डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. शहीद तुकाराम ओंबळे हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा 2008 सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर 26 जानेवारी 2009 रोजी तुकाराम ओंबळे यांना अशोक चक्र हा पुरस्कार देण्यात आला.