गॅस एजन्सीच्या गाड्यांमुळे वाहतुकिला अडथळा…!

0

नवी मुंबई : वाशी – कोपरखैराणे मार्गावर असलेल्या मरीआई मंदिरासमोर असलेल्या नाकोडा व ललित गॅस एजन्सीच्या सिलेंडरने भरलेल्या मोठ्या गाड्या रस्त्यावर उभ्या करून सिलेंडरची चढ उतार त्याच ठिकाणी होत असल्याने सकाळ संध्याकाळ ह्या मार्गावरील वाहतूककोंडी पाहायला मिळत आहे. समोरच मंदिर असल्याने भाविकांची गर्दी येथे कायम असते. अश्यात गॅस गळती किंवा सिलेंडर ब्लास्ट मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.

गजबजलेला परिसर त्यात गाड्यांची भर
वाशी कोपरखैराणे मार्ग हा वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. येथील प्रकल्पग्रस्त व नव्याने नवी मुंबईत वास्तव्यास आलेल्या भाविकांचे जागृत देवस्थान म्हणजेच ह्या मार्गावरील जुहूगाव से.11 येथील मार्गाच्या मध्यस्थानी असलेले मरीआईचे मंदिर भक्तांसाठी लोकप्रिय आहे. मंदिरासमोरील एका भागात पेट्रोलपंप तर दुसर्‍या भागात नाकोडा व ललित गॅस एजंसीसचे एचपी गॅस पुरवठा कार्यालय आहे.

स्थानिकांत दुर्घटनेच्या भीतीचे सावट
वाहने चुकीच्या पद्धतीने खाली सिलेंडर घेवून जाणार्‍या व भरलेले सिलेंडर आणणार्‍या मोठ्या वाहनांची ये-जा कायम सुरु असते. अनेकदा येथे येणारी वाहने चुकीच्या पद्धतीने आणली जातात. तसेच गॅस कंपन्यांची वाहने व्यवस्थितपणे उभी केली जात नसल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. वाशी कोपरखैरणे मार्गावरील संध्याकाळच्या वाहतूककोंडीत यामुळे भर पडत आहे. गॅस एजन्सीत येणारे ग्राहक तसेच मंदिरात येणारे भाविक व पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी लागणार्‍या वाहनांच्या रांगा यामुळे हा परिसर सतत वर्दळीचा असतो. गॅस सिलेंडर्सची रस्त्यावर होणारी चढउतार अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे येथील स्थानिक दुर्घटनेच्या भीतीने कायम तणावाखाली असतात.

ह्या एजन्सीच्या गाड्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून येत्या एकदोन दिवसांत स्थानिक वाशी पोलीस व वाहतूक शाखेची संयुक्त कारवाई करणार आहे.

– सतिश गायकवाड,
व.पो.निरीक्षक, वाशी वाहतूक शाखेचे