चिपळूण : घरगुती गॅसची गळती होऊन पाचजण होरपळल्याची घटना शहरातील वडनाका येथील शंकर-पार्वती अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये घडली. जखमी झालेल्यांमध्ये एका बालकासह तीन महिला व फ्लॅट मालकाचा समावेश आहे. या गळतीमुळे फ्लॅटच्या भिंतीला तडे गेले असून दोन दरवाजांचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. सुदैवाने स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सुनील खेडेकर, वंदना पोटसुरे, आदित्य पोटसुरे, रोहिणी ढोले, शाबिरा दाभोळकर अशी जखमींची नावे आहेत. वडनाका येथील शंकर-पार्वती अपार्टमेंटमध्ये सुनील खेडेकर यांचा फ्लॅट आहे. बुधवारी खेडेकर यांच्या फ्लॅटमध्ये कोणी नसताना त्यांच्या फ्लॅटमधून गॅसचा वास येत असल्याचे शेजार्यांच्या लक्षात आले. याची माहिती त्यांना भ्रमणध्वनीद्वारे देण्यात आली. त्यामुळे ते तात्काळ फ्लॅटमध्ये आले व फ्लॅटचा दरवाजा उघडला. याचवेळी वरील चौघेजण काय झाले म्हणून बघण्यासाठी फ्लॅटमध्ये घुसले. मात्र फ्लॅटमध्ये गॅस पसरल्याने त्यात ते होरपळले व त्यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तरीही त्यांनी फ्लॅटच्या खिडक्या व दरवाजे उघडले. त्यानंतर गॅसचा व्हॉल्व बंद करण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेले असतानाच बेडरूममध्ये स्पार्कींग झाले व गादी जळाली. यातील रोहिणी ढोले यांच्या साडीने पेट घेतला. त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायाला जखमा झाल्या, तर खेडेकर यांच्याही कपडयांनी पेट घेतला. मात्र त्यांनी तात्काळ कपडे काढल्याने तेही किरकोळ जखमी झाले, तर आदित्य इतरांपेक्षा जास्त भाजला. सर्व जखमींना वेगवेगळया खासगी रूग्णालयांमध्ये नेण्यात आले.
गॅसमुळे भिंतीला तडे
फ्लॅटमध्ये मोठ्याप्रमाणात गॅस साचून राहिल्याने त्याच्या दाबामुळे भिंतीला तडे गेले, तर दोन दरवाजे उघडताच त्याचेही तुकडे झाले. काही प्रमाणात निर्माण झालेली आग पाण्याने विझवण्यात आली. या घटनेत खेडेकर यांचे भिंतीला तडे जाऊन, दरवाजे तुटून, गाद्या जळून सुमारे 64 हजार 600 रूपयांचे नुकसान झाले आहे. ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. केवळ गळतीमुळे फ्लॅटच्या भिंतीला तडे गेले, दरवाजे तुटले. त्यामुळे जर सिलिंडरचा स्फोट झाला असता तर इमारतीलाच मोठा धोका झाला असता. सुदैवाने ही दुर्घटना टळली.