कोणतीही जीवित हानी नाही झाली
पिंपरी : गॅस लिकेज झाल्याने बांधकाम कामगारांच्या झोपडीला आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वाकडमधील कस्पटेवस्ती येथे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामगारांच्या 4-5 झोपड्या जळून खाक झाल्या. कस्पटे वस्तीमधील दत्त मंदिराजवळ बांधकाम कामगारांच्या झोपडया आहेत.
आज सकाळी सर्व कामगार कामावर गेले असता एका झोपडीतील गॅस लिकेज झाला. अचानक लिकेज झालेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे परिसरातील 4 ते 5 झोपड्यांना आग लागली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर आणि राहटणी अग्निशमन केंद्राचे दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले. सर्व कामगार कामासाठी घराबाहेर पडल्याने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, आगीमध्ये 5 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. ही आग सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली नसून लिकेज झालेल्या गॅसने पेट घेतल्यामुळे लागली असल्याची शक्यता अग्निशमन विभागाने वर्तविली आहे.