गॅस सिलिंडर एजन्सीवर चोरट्यांचा दरोडा

0

२४ हजाराचा मुद्देमाल लंपास

सोनगीर । परिसरात असलेल्या गॅस सिलींडर एजन्सीमध्ये अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री शटरचे कुलूप तोडून दरोडा टाकला यात गॅस साहित्य आणि रोकडसह २४ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. एजन्सी मालकांच्या तक्रारीवरुन सोनगीर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेमुळे मात्र सोनगीरच्या व्यापार्‍यांमध्ये दहशत पसरली आहे. सोनगीर गावशिवारातील वाघाडी फाट्यानजीक मे.चिरायू डेरे इण्डेन ग्रामीण वितरक नावाने गॅस सिलेंडर व साहित्य विक्रीचे दुकान आहे. ह्याच एजन्सीवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरटे वॉल कंपाऊंडचे कुलूप तोडून आत गेले. लाकडी फर्निचर, कपाट, दरवाजे तोडून कागदपत्रे फेकून दिली. कॉम्प्युटर व इन्व्हर्टरच्या वायरी तोडल्या. त्यानंतर मिळालेला मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.

अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल
बुधवारी सकाळी एजन्सी मालक, मॅनेजर व कर्मचारी दाखल झाले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी लंपास केलेला मुद्देमाल १५ हजाराची रोकड, २ हजार किंमतीची इन्व्हर्टरची बॅटरी, २ हजार २५० रुपयाचे १५ रेग्युलेटर, १५ हजाराचे इंण्डेन गॅस लायटर (२५ नग), ४०० रुपये किंमतीचे ४ कमर्शियल रेग्युलेटर आणि २ हजार पाचेशे रुपये किमंतीच्या २५ गॅस नळ्या आदी साहित्य चोरीला नेण्यात आले, असे फिर्यादीत कृष्णा डेरे यांनी नमूद केले आहे. पुढील तपास सोनगीर पोलिस करीत आहेत.