नवी दिल्ली । अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला 4 रुपयांची वाढ होणार असल्याची घोषणा सोमवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. याआधी केंद्र सरकारने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या कंपन्यांना अनुदानित सिलिंडरच्या किमतीत महिन्याकाठी 2 रुपयांची वाढ करण्याच्या सूचना केल्या होत्या. आता घरगुती वापराच्या अनुदानित सिलिंडरच्या किमतींमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत बोलताना दिली.
वर्षाला मिळतात 12 सिलेंडर्स
सध्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 12 सिलिंडर अनुदानित दरांमध्ये मिळतात. यानंतरचे सिलिंडर ग्राहकांना बाजार भावानुसार खरेदी करावे लागतात. जुलै महिन्यात प्रत्येक सिलिंडरवर 86.54 रुपयांचे अनुदान दिले जात होते, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. सध्या देशातील अनुदानित दरांमध्ये सिलिंडर खरेदी करणार्यांची संख्या 18.11 कोटी इतकी आहे. यामध्ये 2.5 कोटी गरिब महिलांचा समावेश आहे. या महिलांना मागील वर्षभरादरम्यान उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. अनुदानित दरातील सिलिंडर न वापरता बाजारभावानुसार सिलिंडर खरेदी करणार्यांची संख्या 2.66 कोटी इतकी आहे.