गेंदालाल मधील वृध्दाला विटा मारणार्‍या दोघांना अटक

0

तहसील कार्यालयाजवळील घटना : शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव– नमाज पठाण करुन सायकलीवरुन घराकडे जात असतांना कौनईन अब्दुल हाफिज वय 48 रा. गेंदालाल मिल यांना दोन तरुणांनी वीटा मारुन दुखापत केल्याची घटना 30 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी अमोल दिलीप साळुंखे वय 20, रा.जैनाबाद , विनोद भिकन पाटील वय 37, रा.धनाजी काळेनगर , शिवाजीनगर या दोघा तरुणांना शनिवारी अटक केली आहे.

काय घडली होती घटना

गेंदालाल मिल परिसरात कौनईन हाफिज हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते जैनाबाद मधील मक्का मशीद येथे मौलाना म्हणून काम करताात. सध्या लॉकडाऊन असल्याने हाफिज यांच्यासह केवळ चार जण दररोज नमाज पठण करीत असतात. 30 रोजी रात्री 9 वाजता हाफिज हे नमाज पठण करुन सायकलीवरुन घराकडे परतत होते. याादरम्यान तहसील कार्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी मागून येवून हाफिज यांना दगड फेकून मारला. दगड न लागल्याने दुचाकीवरील दोघांनी हाफिज यांच्या पाठीवर जोरात वीट फेकून मारली. यानंतर दुचाकीवरुन दोघे पसार झाले. यात हाफिज यांच्या पाठीला जबर दुखापत झाली. त्यांनी घरी प्रथमोपचार केले. यानंतर त्यांनी हा प्रकार फारुख शेख यांना सांगितला. यानंतर शेख यांच्यासोबत शहर पोलीस ठाणे गाठले व प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यावरुन दोघा तरुणाविरोधात गुरन 73/2020 भादवी कलम 337,34 गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरिक्षक अरुण निकम यांनी गुन्हे शोध पथकाला संशयित निष्पन्न करुन त्यांना अटक करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार संशयितांपैकी एक तरुण जैनाबाद येथील भाजीपाला विक्रेता असल्याचे तर दुसरा शिवाजीनगरातील असल्याचे निष्पन्न झाले. दोघेही घरी असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरिक्षक अरुण निकम यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास अमोल साळुंखे , विनोद पाटील या दोघा संशयित तरुणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.