जळगाव – शहरातील गेंदालाल मील परिसरात पोलीस चौकीजवळील टपरीही पेटविण्याचा प्रयत्न करुन ते न पेटल्याने घरासमोर उभी प्रवासी वाहतूक रिक्षा पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. वेळीच प्रकार लक्षात आल्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली. अन्यथा पूर्ण रिक्षा खाक झाली असती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेंदालाल मील परिसरात बिल्डींग नं 16 रुम 10 याठिकाणी रेहमान अरमान खान पत्नी, मुले तसेच भाऊ, वहिनी अशा कुटुंबासह एकत्र राहतात. 22 वर्षापासून ते रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवित आहे. शनिवारी रात्री रेहमान खान यांनी नेहमीप्रमाणे त्यांची प्रवासी वाहतूक रिक्षा (क्र.एमएच.19.व्ही.8135) घराजवळ उभी केली व रात्री जेवण आटोपून ते झोपून गेले.
रिक्षावरील दगड पडल्याने घटना समोर
रेहमान खान यांनी नेहमीप्रमाणे रिक्षावर फट झाकला होता. फट उडत असल्याने त्यांनी त्यावर दगड ठेवला होता. रात्री 2 वाजेच्या सुमारास फटावर ठेवलेले दगड रिक्षात पडल्याने मोठ्याने आवाज झाला. या आवाजाने रेहमान खान उठले व खिडकीतून बघितले असता रिक्षा जळत असल्याचे दिसते. त्यांनी तत्काळ घरातीत पाण्याचा मारा करुन आग विझविली. रिक्षाचा टप, सिलींग व चारही सिट जळून खाक होवून नुकसान झाले आहे.
टपरही जाळण्याचा प्रयत्न
दरम्यान रिक्षा पेटविण्याआधी माथेफिरुने रिक्षापासून काही अंतरावर रेहमान यांची असलेली टपरीही जाळण्याचा प्रयत्न केल्याचे शनिवारी सकाळी लक्षात आले. टपरीवरील बांबू अर्धवट जळाल्याने टपरही पेटविण्याचा प्रयत्न झाला मात्र ती न पेटल्याने त्याने रिक्षा जाळल्याचे रेहमान यांनी सांगितले. कुठल्याच प्रकारे कुणाची वैमनस्य नसल्याने नेमकी रिक्षा कुणी जाळली, हा प्रश्न पडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.