गेटवे मांडवा जलवाहतूक हाऊसफुल्ल, पर्यटक नववर्षच्या स्वागताला अलिबागमध्ये

0

अलिबागमध्ये पर्यटकांचा मेळावा

महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका

अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप तर उगवत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागकडे येण्यास सुरुवात झाली आहे. गेटवे येथून जलवाहतुकीने आरामदायी प्रवास करीत पर्यटक मांडवा बंदरात दाखल होत आहेत. मुंबईकडून अलिबागकडे जलवाहतुकीने येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या पाहून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने अतिरिक्त 25 जलवाहतूक बोटीची सुविधा नववर्षाच्या निमित्ताने केली आहे, अशी माहिती मांडवा बंदर निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारे हे पर्यटकांसाठी आकर्षणाची ठिकाणे असल्याने अलिबागला पर्यटकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला अलिबागमध्ये पर्यटक जलवाहतुकीने येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई गेटवे येथून जलवाहतुकीने पर्यटक मांडवा बंदरात येऊन तेथून बसने अलिबागकडे रवाना होत आहे. जलवाहतुकीने पर्यटक भरभरून येत असल्याने अलिबागेत लाखोंच्या संख्येने पर्यटक येतील असा अंदाज बांधण्यात येत आहे. रस्ते मार्गापेक्षा जलवाहतूक प्रवास हा आरामदायी व सुखकारक आहे. हा प्रवास करताना सिगल पक्ष्याच्या विहाराचा आनंद पर्यटक लुटत आहेत.

नववर्ष स्वागताच्यानिमित्ताने मुंबईकडून येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने मेरिटाईम बोर्डाने रोजच्या जलवाहतूक फेर्‍याबरोबर अतिरिक्त 25 फेर्‍या वाढविल्या आहेत. तसेच पर्यटक हे खाजगी बोटीनेही मांडवा बंदरात येत आहेत. वयोवृद्ध, लहान बालके, विकलांग या व्यक्तीसाठी बग्गीची सुविधा जेट्टीपासून बस सेवेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच मांडवा बंदरात मेरिटाईम बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांसोबत खाजगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आलेले आहेत. मुंबई गेटवे येथून येणार्‍या पर्यटकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी सर्वतोपरी तयारी मेरिटाईम बोर्डामार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती मांडवा बंदर निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. नववर्षाच्या स्वागताला आलेले पर्यटक हे नववर्ष स्वागत करूनच निघणार असल्याने अलिबाग तालुक्यात सध्या पर्यटकांचा मेळावा भरलेला दिसत आहे.

दोन ते तीन किमीपर्यंत रांग

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे तसेच राज्यातील पर्यटक रायगडसह कोकणात जाण्यास निघाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर जिते पासून पुढे ठिकठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने याचा फटका पर्यटकांना सहन करावा लागत आहे. नववर्षाच्या निमित्ताने महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर चालकांच्या बेदरकारपणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. रायगडसह कोकण आणि गोव्यात जाणार्‍या पर्यटक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर पेण तसेच जिते, खारपाडा, तरणखोप, रामवाडी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. येथील वाहतूक संथ गतीने सुरू असून दोन ते तीन किमी पर्यत रांगा लागलेल्या आहेत.

वळणे योग्य प्रकारे नाहीत

महामार्गावर ठिकठिकाणी चौपदरीकरणांची कामे सुरू असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. वाहतूक शाखेने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. तसेच वळण योग्य प्रकारे ठेवलेली नसल्याने अनेकदा वाहतुक ठप्प होत आहे.