गेलचे संघात असणेही पुरेसे

0

बंगळुरु । आयपीएल लिलावात एकाही फ्रँचायझीने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर बोली लावली नाही तेव्हा सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. मात्र पहिल्या दिवसाच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या ख्रिस गेलवर दुसर्‍या दिवशी बोली लावण्यात आली. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला बेस प्राईस 2 कोटींमध्ये खरेदी केले. गेलला खरेदी करताच सर्व फ्रँचायझींनी पंजाबचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. मात्र त्याचे संघात असणेच पुरेसे आहे, अशी प्रतिक्रिया पंजाबचा मेंटॉर आणि भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिली. सलामीवीर फलंदाज म्हणून तो कोणत्याही संघासाठी धोकादायक आहे, असे सेहवाग म्हणाला. संघ व्यवस्थापन गेलकडे पर्यायी सलामीवीर फलंदाज म्हणून पाहत आहे. गेलची ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे. त्याच्यावर संघाने दोन कोटी रुपये खर्च केले, मात्र मार्केटिंग स्ट्रॅटेजीनुसार हे फायदेशीर आहे. तो जास्त सामने खेळू शकणार नाही. मात्र एक बॅकअप सलामीवीर फलंदाज म्हणून संघात असेल, असे सेहवाग म्हणाला.

निता अंबानींना दु:ख
आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे. या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला संघामध्ये कायम ठेवले तर लिलावावेळी किरॉन पोलार्ड आणि कृणाल पांड्याला राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा आपल्याकडे घेतले. या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानींनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या खेळाडूला संघामध्ये विकत घेता आले नसल्यामुळे मी नाराज नाही पण हरभजन सिंग आता मुंबईच्या संघामध्ये नसल्यामुळे मला दु:ख झाल्याचे नीता अंबानींनी एका मुलाखतीत सांगितले.

आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. आयपीएलच्या इतिहासात हरभजन आणि कोहली हे दोनच खेळाडू सगळ्या आयपीएल एकाच संघाकडून खेळले होते. विराट कोहली अजूनही आरसीबीच्या संघामध्ये कायम आहे. आता हरभजनला चेन्नई सुपरकिंग्जने विकत घेतले आहे. मुंबई इंडियन्सकडून त्यांच्या पुढच्या योजनेबद्दल मला सांगण्यात आले होते. मुंबई इंडियन्स मला कुटुंबासारखं आहे आणि त्यांचा निर्णय मला स्वीकारावाच लागणार आहे.

नेपाळचा संदीप
संदीप लामिछेन हा आयपीएलच्या लिलावात बोली लागलेला नेपाळचा पहिला क्रिकेटर ठरला आहे. आयपीएलच्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने संदीप लामिछेनवर यशस्वी बोली लावली आहे. दिल्लीला संदीपला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे वीस लाखांमध्ये विकत घेतले. सतरा वर्षांचा संदीप लामिछेन हा लेग स्पिनर आहे. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षाखालील विश्‍वचषक स्पर्धेत त्याने लक्षवेधक कामगिरी बजावली होती. संदीपने सहा महिन्यात 17च्या सरासरीने 14 बळी घेतले होते. सर्वात जास्त बळी घेणारा तो दुसर्‍या क्रमांकाचा गोलंदाजही ठरला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क हा देखील संदीपच्या कामगिरीने प्रभावित झाला होता. त्यामुळे त्याने हाँगकाँग टी-20 ब्लिट्जमध्ये कोउलून कांटून्सकडून खेळण्यासाठी त्याची निवड केली होती. सायंग्जा येथे जन्मलेल्या संदीपचे वडील भारतीय रेल्वेत कार्यरत होते. संदीप जवळजवळ दोन ते तीन वर्ष भारतातच वास्तव्यास होता.