गेल्या वर्षभरात पाच लाख नागरीक बनले ‘पासपोर्ट’धारक

0

अवघ्या सहा दिवसांत कागदपत्रांच्या पडताळणीचे उद्दिष्ट

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर गती

पुणे : शहरात पारपत्रधारकांची (पासपोर्ट) संख्या वेगाने वाढत आहे. पोलिसांकडून करण्यात येणार्‍या पासपोर्ट कागदपत्रांच्या पडताळणीचा निपटारा करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष प्रयत्न करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनीदेखील कागदपत्रांची पडताळणी जलदगतीने करण्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेला उद्दिष्ट दिले होते. अवघ्या सहा दिवसांत कागदपत्रांच्या पडताळणीचे उद्दिष्ट देण्यात आल्यानंतर गेल्या वर्षभरात पाच लाख नागरिकांच्या पासपोर्ट कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली. त्यापैकी साडेचार लाख नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहे.

पासपोर्ट पडताळणीचा कालावधी 21 दिवसांवर आणला

पुणे शहरात मोठ्या संख्येने आयटी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्था आहेत. परदेशात नोकरीसाठी वा शिक्षणासाठी जाणार्‍या युवक-युवतींची तसेच पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांची संख्या वाढत आहे. दीड वर्षांपूर्वी पासपोर्ट कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पोलिसांना महिनाभराचा कालावधी लागत असे. नागरिकांच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरत होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पासपोर्ट पडताळणीसाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तशा सूचना विशेष शाखेला देण्यात आल्या. पासपोर्ट पडताळणीचे काम विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून पार पाडण्यात येते. त्यानंतर पासपोर्ट पडताळणीचा कालावधी 21 दिवसांवर आणण्यात आला.

4.5 लाख नागरिकांना पासपोर्ट

ऑगस्ट ते डिसेंबर 2018 या कालावधीत अडीच लाख नागरिकांच्या पासपोर्ट कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पाच लाख नागरिकांच्या पासपोर्ट कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर गेल्या वर्षभरात साडेचार लाख नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहे.

पोलिसांना कागदपत्र पडताळणीचे उद्दिष्ट

ऑगस्ट महिन्यात पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलिसांना कागदपत्र पडताळणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. त्यानंतर 21 दिवसांचा कालावधी 10 दिवसांवर आला.