गेहलोतांकडून पायलटांवर खालच्या शब्दात टीका: वरिष्ठांकडून कानउघाडणी

0

जयपूर: सचिन पायलट यांनी बंड केल्याने राजस्थानमध्ये राजकीय संघर्ष पेटला. कॉंग्रेसने सचिन पायलट यांच्यावर कारवाई करत त्यांना उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केले. अजूनही सचिन पायलट माध्यमांसमोर आलेले नाही. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सातत्याने पायलट यांच्यावर टीका करत आहेत. काल तर गेहलोत यांनी अतिशय खालच्या शब्दात पायलट यांच्यावर टीका केली. सचिन पायलट यांच्याबाबत ‘निकम्मा’, ‘नकारा’ असे शब्द वापरले. परंतु गेहलोत यांनी वापरलेल्या शब्दावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतले असून गेहलोत यांची कानउघाडणी केली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सचिन पायलट यांच्यावर टीका करताना अशोक गेहलोत यांनी पातळी ओलांडली होती. ‘निकम्मा-नकारा’ हे शब्द वापरले, त्याबद्दल हायकमांडकडून त्यांची कानउघडणी करण्यात आली. आपल्या पक्षाच्या माजी उपमुख्यमंत्र्याबद्दल अशा पद्धतीच बोलणे योग्य नाही अशा शब्दात वरिष्ठांनी गेहलोत यांना फटकारले आहे.

सचिन पायलट यांच्या पक्षात परतण्याची आशा काँग्रेसने अजूनही सोडलेली नाही. सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आता ही लढाई कोर्टात गेली आहे. पुढच्या काही दिवसात काँग्रेस विश्वासदर्शक ठरावाला सामोरी जाईल. उच्च न्यायालय काय निर्णय घेतं त्यावर पुढची दिशा ठरेल.