गैरकारभार झाल्याचा कांगावा करत आहेत विरोधक

0

नंदुरबार । नगरपालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असतांना विरोधकांना ते दिसत नाही. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय असा खुलासा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. नंदुरबार शहरातील ज्ञानदीप सोसायटीत झालेल्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दोन दिवसापूर्वी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परीषद घेवून नगर पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की व्यापारी संकुलमधील गाळे विकून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असे पारदर्शक लिलाव प्रक्रिया व्हावी यासाठी व्हीडिओ चित्रीकरण केले जाते. असे असतांना गैरकारभार झाल्याचा कांगावा विरोधक करतात, हे आर्श्‍चयच म्हणावे लागेल.

कुठल्याही चौकशा लावा, सामोरे जाण्यास तयार
नगर पालिकेत गैरकारभार झाला असेल तर कुठल्याही चौकशा लावा, आपण त्यांना सामोरे जाण्यास तयार आहोत, असेही आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट केले. पूढे ते म्हणाले की पालिका निवडणुका सहा महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे अनेक जण भूछत्रापमाणे आता उगवत आहेत. साडेचार वर्ष ज्यांना गैरकारभार दिसला नाही, त्यांना आता जाग येत आहे. मात्र नंदुरबार शहरातील नागरीक सुजान असून ते अशा भूलथापांना बळी पडणार नाहीत. विकास कामांमध्ये अडथळा आणण्याची मानसिकता विरोधकांमध्ये पूर्वीपासून आहे. शहरातील विकासकामे नागरीकांच्या डोळ्यासमोर असून याच कामांच्या जोरावर आपण पून्हा नगरपालिका निवडणूकांना सामोरे जाणार आहोत असेही स्पष्टीकरण आमदार रघुवंशी यांनी बोलतांना केले.