बारामती । बारामती नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व गटनेते सचिन सातव पीओजो कंपनीच्या रिक्षा वाहतूक करणार्या वाहन मालकांच्या बारामती मोटार वाहन संघाचे उपाध्यक्ष असताना बारामती सहकारी बँकेचे संचालक पदही त्यांच्याकडे होते. सचिन सातव यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष दिपक तावरे, सचिव सौरभ गांधी या तिघांनी संगनमताने बँकेत 2 कोटी 63 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी बारामती येथील प्रधानवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. बडवे यांनी बारामती पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सचिन सातव गोत्यात आले आहेत. या तिघांनी सभासदांना विश्वासात न घेता स्वत:च्या नावाने 2 कोटी 63 लाख रुपये बँकेतून काढलेले आहेत. याबाबत प्रशांत सातव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश बारामती शहर पोलिस स्टेशनला दिलेले आहेत.
काय आहे प्रकरण
बारामती एमआयडीसीतील पीआजो कंपनीच्या वाहतूूकदारांनी बारामती मोटार वाहन संघ ही संस्था सुरू केली होती. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून दिपक तावरे, उपाध्यक्ष म्हणून सचिन सातव, आणि सचिव म्हणून सौरभ गांधी हे कार्यरत आहेत. तर प्रमोद सातव हे या संस्थेचे खजिनदार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सभासदांसाठी विविध योजना राबविण्यासाठी तसेच संस्थेच्या कार्यालयासाठी निधी जमविला जात होता. त्यासाठी बारामती सहकारी बँकेत संस्थेचे खाते सुरू करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या तिघांपैकी दोघांच्या संयुक्त सहीने या खात्याचे व्यवहार करण्याचेही संस्थेच्या नियमावलीत ठरविण्यात आले होते. सचिन सातव हे बारामती सहकारी बँकेचे संचालक असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व दबाव टाकून एकट्याच्या सहीनेच या खात्यावरील व्यवहार सुरू ठेवले होते. संस्थेचे पदाधिकारी अथवा सभासदांना विश्वासात न घेता सचिन सातव यांनी वेळोवेळी संस्थेच्या खात्यातून तब्बल 2 कोटी 63 लाख रूपये काढले. या रकमा त्यांनी कधी स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर केल्या तर काही स्वत:च्या नावाने धनादेश देऊन घेतल्याचे समोर आले आहे. या संस्थेच्या खात्यातून नियमबाह्यपणे रकमा काढून उपाध्यक्ष सचिन सातव यांनी गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती प्रशांत सातव यांनी दिली.
बँकेचे अधिकारी अडचणीत
तक्रारदार प्रशांत सातव यांनी बारामती शहर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचा अर्जही पोलिसांना देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली होती. आता न्यायालयानेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बँकेचे अधिकारीही अडचणीत आले आहेत.
तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
या गैरव्यवहार प्रकरणी प्रशांत सातव यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात 20 एप्रिल 2017 रोजी तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाने या प्रकरणात अनेक मुद्द्यांवर ताशेरे ओढत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे प्रशांतनाना सातव व प्रमोद सातव यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे सचिन सातव यांनी काढलेल्या 2 कोटी 63 लाख रुपयांपैकी 1 कोटी 76 लाख 51 हजार 800 रूपयांचा भरणा बँकेत केला आहे. हा भरणाही अतिशय चलाखीने केला असून केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केलेला असताना आणि खात्यांवरील निर्णयांवर निर्बंध आले असताना सचिन सातव यांनी या रकमेचा भरणा केला. संस्थेत गैरव्यवहार करतानाच त्यांनी नोटाबंदीच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याचे याचिकेत म्हटले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसला चांगलाच धक्का बसला आहे. नगरपालिकेची विविध प्रकरणे बाहेर येत असताना या प्रकरणामुळे नागरीकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.