गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाई करा

0

घोडेगाव । आंबेगाव तहसील कार्यालयामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना तहसील कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी अनुपस्थित होते. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांना माजी पंचायत समिती सभापती कैलास काळे यांनी दिले आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व कार्यालय एकाच ठिकाणी असावी. या उद्देशाने घोडेगावात एकाच जागी सर्व शासकीय कार्यालये उभारण्यात आली. यामध्ये तहसील कार्यालय आंबेगाव, आदिवासी प्रकल्प कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भुमापन कार्यालय, वन विभाग आदी कार्यालये एकाच छताखाली आली. तहसील कार्यालयामार्फत दरवेळी संबंधित कार्यालयांना कार्यक्रम पत्रिका देलेली असते. परंतु गेली काही वर्षे या कार्यालयांतील एकही अधिकारी 1 मे, 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी कधीही झेंडावंदन कार्यक्रमाच्यावेळी हजर राहत नाहीत. तसेच जवळच असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत उपविभागीय कार्यालय, आंबेगाव पंचायत समितीमधील काही अधिकारी हे झेंडावंदन करण्यासाठी आपल्या कार्यालयात येतात मात्र अर्धा किमी अंतरावर असणार्‍या तहसील कार्यालयात जाण्यास त्यांना उत्साह नसतो. घोडेगाव कार्यक्षेत्रातील संबंधित कार्यालयातील अधिकारी हे पुण्यात ध्वजवंदन करतो, असे सांगतात.

परंतु आपल्या कार्यालयात ध्वजवंदन करण्यात येत नाहीत. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी हे तहसील कार्यालयात ध्वजवंदन करण्यास का आले नाही? जे अधिकारी, कर्मचारी गैरहजर होते त्यांनी आपली परवानगी घेतली होती का, आदी बाबतचे मुद्दे माजी पंचायत समिती सभापती कैलास काळे यांनी निवेदनात मांडले आहेत.