धुळे । शहरातील पेठ भागात असलेल्या विविध नागरी समस्या सोडविण्यात याव्यात. या मागणीसाठी मनपात निवेदन घेऊन गेलेल्या भाजपच्या पदाधिकार्यांना आयुक्त, उपायुक्त न भेटल्याने त्यांनी आयुक्त, उपायुक्तांच्या दालनालाच मागण्यांचे निवेदन चिटकवून घोषणाबाजी करीत या अधिकार्यांचा निषेध केला.
नागरी समस्यांकडे होतेय दुर्लक्ष
या निवेदनात म्हटले आहे की, पेठ भाग हा शहरातील प्रमुख भाग असून या ठिकाणी विविध नागरी समस्या आहेत. महात्मा गांधी पुतळा ते सुभाष पुतळ्यापर्यंतचा रस्ता तसेच आदर्श पुस्तकालय ते मरीमाता मंदीरपर्यंतचा रस्ता, टॉवर बगीचा ते ग.नं.7 पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पेठ विभागातील नालेसफाई, जीर्ण झालेल्या व धोकादायक असलेल्या घरासंबंधी मालकांना नोटीस यासह स्वच्छतेसंबंधी तक्रार करण्यात आली आहे. तसेच बंद पथदिवे सुरु करावेत, अतिक्रमण काढून बंद रस्ते चालू करावेत यासह डंपींग ग्राऊंडला लागलेल्या आगीची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात भाजपा पेठ विभाग मंडळाचे जितेंद्र धात्रक, किरण रनमळे, तुषार भागवत, अमोल मराठे, स्वप्निल लोकरे, सागर कोडगिर, सचिन कायस्थ, सागर लाड आदी सहभागी झाले होते.