गैरहजर वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईचे होणार

0

पुणे : कामाच्यावेळी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये संबंधित कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकारी हजर नसेल तर त्यांच्यावर आयुक्तांमार्फत कारवाई करण्याच्या सूचना स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत. मोहोळ यांनी पावसाळ्यातील महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला.

आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवा
पावसाला सुरवात झाल्याने गेल्या काही दिवसात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात, ताप, हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, कॉलराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये आणि प्रसुतीगृहांमधील कामकाजाचा मागोवा त्यांनी घेतला. त्यातच, रुग्णांच्या काही तक्रारी येत असल्याने रुग्णालये, दवाखान्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. पावसाळ्यातील आजार आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना महापलिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी केली आहे. यासंदर्भातील आरोग्य खात्याच्या अहवालानंतर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

अहवाल मागवला
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांच्यावर वेळेत आणि चांगले उपचार व्हावेत, यासाठी पुरेसा औषधसाठा, इतर उपकरणे पुरविण्यात येतील. त्यासाठी आरोग्य खात्याकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-मुरलीधर मोहोळ