गैरहजेरीबद्दल शिक्षकाची विद्यार्थिनीला मारहाण

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याच्या कारणावरून शिक्षकाने पाचवीच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला. चिखली-जाधववाडी येथे महापालिकेची साई जीवन प्राथमिक शाळेत ही घटना घडली. घरी आल्यावर विद्यार्थिनीने मारहाणीचा प्रकार सांगितल्यावर स्थानिक नगरसेवक राहुल जाधव यांच्याकडे तक्रार करण्यात आली.

दंड पडला काळानिळा
10 वर्षाची सोनम जैस्वाल पाचवीच्या वर्गात आहे. पोटात दुखत असल्यामुळे ती दोन दिवस शाळेत जाऊ शकली नाही. गैरहजर राहिल्यामुळे शिक्षक श्रीकृष्ण केंगळे यांनी दोन विद्यार्थ्यांना तिच्या घरी चौकशीला पाठवले. या विद्यार्थ्यांबरोबर ती शाळेमध्ये आली. यानंतर केंगळे यांनी तिला गैरहजर राहण्याचे कारण विचारले. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिच्या आणि त्यानंतर सोनमला केंगळे यांनी तिला बेदम मारहाण केली. यामुळे तिचा दंड काळानिळा पडला आहे. घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यांनी त्वरित स्थानिक नगरसेवक राहुल जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे तक्रार केली.

दोषींवर कारवाई करू
याबाबत शिक्षणाधिकारी बी. एस. आवारी यांना विचारले असता ते म्हणाले, मला नुकतीच माहिती मिळाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका रजेवर आहेत. गायकवाड नावाच्या शिक्षिकेकडे कामकाज दिले आहे. मारहाण करणार्‍या केंगळे आणि गायकवाड या शिक्षिकेला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. चौकशी करून दोषी शिक्षकावर कारवाई केली जाईल. दरम्यान, याबाबत संबंधित शिक्षिकेची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.