एखाद्या क्षेत्रात आपली मक्तेदारी अबाधित राहावी यासाठी देवाच्या नावाचा वापर केलेला शब्द म्हणजे “गॉडगिफ्ट”, अशी सुंदर आणि सोपी व्याख्या गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी एकदा केली होती. कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा या क्षेत्रात कार्यरत अनेकांचे यश अनेकदा आकाशाला गवसणी घालणारे असते आणि याच क्षेत्रातून हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. काही साहित्यिक, कवी तर असे सांगतात की भल्या पहाटे शब्द माझ्या भोवताल रुंजी घालतात, एक सणक येते, समाधी लागते आणि शब्द कागदावर झरझर उमटायला लागतात, हे कुणीतरी आमच्याकडून जणू करवून घेतो कुणी पट्टीचा गायक असेच काहीतरी अगम्य आणि दुर्बोध सांगून जातो, कुठली तरी शक्ती आपल्याकडून हे सगळे करवून घेते, असाच संदेश यातून लोकांना देण्याचा उद्देश असतो हे स्पष्ट जाणवते. कुणी 10 वर्षांचा पोर मोठ्यांना लाजवेल असे तबला वादन करायला लागला की “गॉडगिफ्ट” हा शब्द हमखास कानावर येतो. सगळ्याच कला क्षेत्रात देवाच्या देणग्या वाढल्या आहेत. वर वर हा शब्द निरुपद्रवी वाटत असला तरी तो अनेकांच्या मेंदूमध्ये टोकदार भाल्यासारखा घुसतो, कायम मेंदू कुरतडत बसतो. अनेक पिढ्या बरबाद होऊन जातात पण देवाची देणगी मिळत नाही. मूळ विषयावरचे लक्ष विचलित होऊन अशी अलौकिक देणगी देणार्या देवालाच आधी प्रसन्न केले पाहिजे या विचाराने लोक भारावून जातात. त्यातून “गॉडगिफ्ट”वाले अधिक सुरक्षित होतात. खरंच असला काही प्रकार असतो का हो? आपण सारी देवाची लेकरे आहोत हे मान्य केले तर देव लेकरांना काहीही वाटताना भेदभाव करीत असेल का? महालात आणि झोपडीत प्रतिभा वाटताना खरंच त्याचे माप कमी जास्त होत असावे का? आम्ही केलेली जाती धर्माची उतरंड बघून त्याच्या “गिफ्ट”ची यादी तयार होत असेल काय? असे असंख्य प्रश्न तयार होतात. परंतु, प्रतिभा आणि परिश्रम कोणत्याही बंधनाला जुमानत नसतात हेच आजवरच्या कलाविष्काराने दाखवून दिले आहे. आपण मात्र आजही या दैवी देणगीतून बाहेर पडायला तयार नाही.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]
जगातल्या कोणत्याही व्यक्तीला अशी कथित गॉडगिफ्ट असू शकत नाही. जन्मतः कुणीच तल्लख किंवा मठ्ठ असा फरक घेऊन येत नसतो. संस्कार, वातावरण, ओढा, प्रोत्साहन आणि अनुकूलता या सगळ्या यंत्रणा यात आपली भूमिका बजावताना दिसतात. पूर्वीच्या काळात संधीचा दुष्काळ होता आणि कला, साहित्य, संस्कृती जगण्याच्या संघर्षात कोसोदूर राहिल्यात, असा मोठा वर्ग समाजात होता. मात्र, विज्ञानाच्या प्रगतीसोबत संधी निर्माण झाल्या आणि गाव कुसाबाहेरही प्रतिभावंत आहेत हे जगाला मान्य करावे लागले. गेल्या 25 वर्षांत सगळ्याच क्षेत्राने विस्तारित रूप धारण केल्याचा सार्वत्रिक लाभ झाला. एकापेक्षा एक प्रतिभा समोर यायला लागल्यामुळे कथित “गॉडगिफ्ट”वाल्यांची पाचावर धारण बसायचे दिवस आले. असंख्य वाहिन्यांच्या माध्यमातून ताकदीचे गायक, कलावंत आणि नट-नट्या पुढे यायला लागल्या आहेत, यात कोणत्याही दैवी देणगीचा संबंध असल्याचे दिसत नाही. सामान्य माणसाने कला क्षेत्रात येण्याचा विचारही करू नये, आपल्यासाठी राखीव कुरणे असायला हवीत, असे ज्यांना वाटते त्यांनी गॉडगिफ्ट ही सोडलेली पुडी आहे हे लक्षात घ्यायला हवे. लोकांवर मात्र अजूनही या शब्दाचा जबरदस्त पगडा जाणवतो आहे. एकाच वर्गात शिकणार्या दोन मुलांच्या कलागुणात तफावत आढळली, तर त्याचे नेमके कारण न शोधता समाज नेहमीच या शब्दाचा वापर करून मोकळा होतो, शिक्षकही त्याला खतपाणी घालतात “गॉडगिफ्ट” आपण पहिल्यांदा कदाचित त्यांच्याच तोडून ऐकलेला शब्द असतो. एखादा गायक दैवी देणगी असूनही दुसर्या बाजूला प्रचंड मेहनत, रियाज करताना दिसतो, खरंतर ज्याला अशी देणगी लाभली असेल त्याला मेहनत करण्याची गरज नसावी, पण असे होत नाही. मेहनत अधिक प्रभावी होत जाते आणि पुढच्या जीवनात परिणामही देणारी ठरते, आपण मेहनतीला अग्रक्रम देण्याचे विसरून जातो, लक्षात ठेवतो फक्त तो एक फसवा शब्द “गॉडगिफ्ट”.
(लेखक दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)
कला, क्रीडा साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात काही प्रवृत्ती मात्र या “गॉडगिफ्ट” शब्दाला जाणीवपूर्वक जपताना दिसतात. देवाची जशी आराधना करावी लागते तशी कलेचीसुद्धा करावी लागते हे मान्य करूनही “गॉडगिफ्ट” हा तद्दन फसवा शब्द आहे, कुणाला तरी सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी केलेले ते कपट आहे हे अनेकांचे आजही लक्षात येत नाही. या जगात अशी एकही बाब नाही की, जी परिश्रमाने सध्या होऊ शकत नाही. जी गोष्ट एखादी व्यक्ती करू शकते तीच गोष्ट प्रयत्न केले तर कोणतीही व्यक्ती करू शकते. फक्त त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असावी लागते. त्यामुळे जगात अशक्य काहीच नसते, नाहीतर कोणतेही शोध लागलेच नसते हे लक्षात घ्यायला हवे.
पुरुषोत्तम आवारे पाटील – 9892162248