पुणे । ‘नाचे मन मोरा मगन धीगदा धीगी धीगी…ओम शांती ओम…बदन पे सितारे लपेटे हुए…तुम बीन जाऊ कहाँ…गम उठाने के लिए’ यांसारख्या जुन्या गीतांची सुरेल अनुभूती रसिकांनी घेतली. मोहम्मद रफी, किशोर कुमार अशा दिग्गजांच्या रचना अतिशय सुंदररित्या सादर करीत ‘गॉड गिफ्ट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांनी रसिकांना भुरळ घातली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये इक्बाल दरबार यांच्या ‘गॉड गिफ्ट’ या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कर्नल संभाजी पाटील (निवृत्त) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर झालेल्या दगडूशेठचे गणपती बाप्पा, आलो तुमच्या दारी… या गाण्याने रसिकांची विशेष दाद मिळविली. त्यानंतर सादर झालेल्या मुस्कुराने की वजह तुम हो…तुम बिन जाऊ कहाँ…मोहम्मद रफी यांचे गम उठाने के लिए…या गाण्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. मुर्शिद मेरा…चिटीयाँ कलाईयाँ…बेबी डॉल मे सोने दी या गाजलेल्या चित्रपट गीतांनी वातावरणात विशेष रंग भरला.
इक्बाल दरबार यांनी ओम शांती ओम…मेरी उमर के नौजवानो या जुन्या गाजलेल्या गींतावर सॅक्सोफोनवर वादन करुन कार्यक्रमात रंगत आणली. देवा हो देवा… या गाण्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. इक्बाल दरबार यांसह जमीर, आवेज दरबार, सहकलाकारांनी गायन केले.
बाबासाहेब पुरंदरेंचा संवाद
उत्सवांमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो, प्रेरणा मिळते. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून दु:ख व मतभेद विसरून आपण एकत्र यायला हवे. एकमेकांशी भांडण न करता प्रेमाने जगा, असे सांगत बाबासाहेब पुरंदरे यांनी पुणेकरांशी संवाद साधला. गॉड गिफ्ट हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकण्याकरीता त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी बाबासाहेबांनी नाचे मन मोरा मगन धीगदा धीगी धीगी… या गाण्याची फर्माईश केली होती, त्याला प्रतिसाद देत कलाकारांनी उत्तम सादरीकरण करीत शिवशाहीरांकडून बक्षिसही जिंकले.