‘गोकुळ’चे दूध महागले!

0

पुणे : ‘बुंद बुंद मे मलाई‘ अशी टॅगलाईन मिरविणार्‍या गोकुळ दूध संघाने गायीच्या दूधदरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 1 ऑगस्टपासून अमलात येणार आहे. फक्त गायीच्या दुधाचीच दरवाढ झाली असून, म्हशीच्या दुधाचे दर तेवढेच आहेत. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाने ही दरवाढ केली असून, पुणे व मुंबई शहरात येणारे गोकुळचे दूध आता मंगळवारपासून महागणार आहे. इतर दूध संघाच्या दुधातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकर्‍यांनी राज्यभर केलेल्या आंदोलनानंतर दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून दूध खरेदीदरात वाढ करण्यात आली होती. त्याचा आर्थिक बोजा दूध संघांवर पडलेला आहे. त्यामुळे ही अतिरिक्त दरवाढ करावी लागल्याची माहिती गोकुळच्यावतीने देण्यात आली. सद्या गोकुळच्या गायीच्या दुधाचे दर हे 38 रुपये प्रतिलीटर आहे. ते आता 40 रुपये प्रतिलीटर होईल. तर टोन्ड दूध सद्या 40 रुपये प्रतिलीटरने विकले जाते, ते आता 42 रुपये प्रतिलीटर होईल. म्हशीच्या दुधाची मात्र कोणतीही दरवाढ गोकुळने केलेली नाही. गोकुळनंतर कात्रज दूध संघानेही दरवाढीचे संकेत दिले आहेत. तथापि, अद्याप अधिकृत घोषणा होऊ शकली नाही. दूध दरवाढीने पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

गोकुळचे दूधदर
जुने       नवीन
साधे दूध                38        40
गोकुळ टोन्ड दूध       40         42
गोकुळ लाईफ दूध      42         44
सात्विक दूध            43         45