गोकुळधाम हायस्कूलला सांघिक विजेतेपद

0

मुंबई । गोरेगावच्या गोकुळधाम हायस्कूलने 40 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात एकूण 274 गुणांची कमाई करत सांघिक जेतेपदाला गवसणी घातली तर 236 गुण मिळवणारा धीरूभाई अंबानी शाळेचा संघ उपविजेता ठरला. धीरूभाई अंबानी शाळेच्या कियारा बंगेरा हिने 11 वषार्ंखालील वयोगटात चार सुवर्ण पदकांची कमाई करताना चार नव्या स्पर्धा विक्रमांची नोंद केली. 13 वषार्ंखालील मुलांमध्ये पार्ले टिळक शाळेच्या स्वानंद खानोलकरने तीन सुवर्ण आणि तीन रौप्यपदके पटकावताना तीन नवीन स्पर्धा विक्रमांची नोंद केली. फतेह सिंघ या जमनाबाई नरसी शाळेच्या मुलान देखील 11 वर्षांखालील मुलांच्या गटात तीन स्पर्धा विक्रमांची नोंद केली आणि तीन सुवर्णपदके पटकावली.

कियारा बंगेरा हिने 50 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात 36.80 से. अशी वेळ नोंदवताना बॉम्बे स्कॉटीशच्या अपेक्षा फर्नांडिस हिचा 40.83 से. विक्रम मागे टाकला. 200 मी. वैयक्तिक मिडले मध्ये 2:52.15से. आणि 50 मी. फ्री स्टाइलमध्ये 31.60 से. वेळेसह नव्या विक्रमांची नोंद करताना तिने 2016 मधील अपेक्षा हिचे 2:59.44 आणि 32.26 से. विक्रम मोडले. 50 मी. बटर फ्लाय प्रकारात 33.48 से. असा नवा विक्रम करताना तिने 2016 मधील स्वतःचाच 35.72 से. चा विक्रम मागे टाकला. 13 वर्षाखालील मुलांमध्ये स्वानंद खानोलकर या पार्ले टिळक शाळेच्या खेळाडूने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात 1:25.93 सेकंदासह नवा विक्रम प्रस्थापित करताना 2016 मधील सलील गोखले याचा 1:26.31 से. तर सोहम आठल्ये याचा 1:22.92 से. हे विक्रम मागे टाकले. 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत त्याने 1:12.80 अशी वेळ नोंदवत लक्ष्य पुरी याचा 1:13.25 हा विक्रम मोडला.