भुसावळात प्रथमच 13 छड्यांची एकत्र मिरवणूक ः दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रम
भुसावळ- वाल्मिक मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री वीर गोगादेव चौहाण यांच्या 111 व्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील वाल्मिक नगरापासून मंगळवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली तर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छडी मिरवणुकीला सुरूवात झाली. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते छडीचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. जामनेर रोड, बाजारपेठ पोलीस ठाणे, बसस्थानक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, सराफ बाजार, मरीमाता मंदिरमार्गे रात्री उशिरा मिरवणूक नृसिंह चौकातून नेहरू मैदानावर पोहोचली. प्रसंगी भगतांसह उस्ताद खलिपा, मैल मुक्तीयार, टिकायती यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
छडी मिरवणुकीचे आकर्षण
यंदा प्रथमच सजवलेल्या 13 छड्यांची एकाच वेळी मिरवणूक काढण्यात आली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते छडीचे पूजन करण्यात आले. प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपाचे सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक किरण कोलते, पुरूषोत्तम नारखेेडे, माजी नगरसेवक संतोष बारसे, अर्जुन खरारे आदींची उपस्थिती होती. बाजारपेठचे नूतन निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्यासह युवा नेतृत्व व माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीही छडीचे पूजन केले. प्रसंगी माजी नगरसेवक पप्पू बारसे, युवा नेतृत्व सचिन चौधरी, धीरज चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
आठवडे बाजार, डेली मार्केट, सराफ बाजार, मॉडर्न रोड, जुनी नगरपालिका, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठ पोलिस ठाणेमार्गे ही रॅली पुन्हा मूळ जागी पोहोचली. नगरसेवक पिंटू कोठरी व नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी यांनी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. प्रसंगी नगरसेवक किरण कोलते, बापू महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीत माजी नगरसेवक संतोष बारसे, उत्सव समितीचे अध्यक्ष अमित खरारे, अर्जुन खरारे यांच्यासह मोठ्या संख्येेने वाल्मिक समाजबांधव सहभागी झाले.
आठवडे बाजारात प्रतिमा पूजन
श्री गोगादेव जयंतीनिमित्त आठवडे बाजार नृसिंह मंदीराजवळ जहारवीर गोगादेव यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष रमण भोळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पप्पू बारसे, माजी नगरसेवक संतोष बारसे, युवा नेते धीरज बारसे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक रमेश नागराणी, लल्ला देवकर, सुनील पवार यांच्याहस्तेही पूजन करण्यात आले. प्रसंगी लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला. यशस्वीतेसाठी अजय दुलगज, अनिल जेधे, सुनील दुलगज, भीम संगेले, दिलीप सपकाळे, गब्बर चावरीया, राजू तुरकेले, जयपाल पिवाल, राकेश बारसे, मधु निभोंरे, धीरज पंडीत, विनोद जेधे, रंजीत खरारे , विजय नरवाडे, संजु पचरवाल, सुरेश घेघंट, प्रदीप तिवारी, उमाकांत नेवे यांच्यासह समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.