गोजोर्‍यात दोन गट भिडले : पाच जण जखमी

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा ; किरकोळ वाद उफाळला ; लाठ्या-काठ्यांसह हॉकी स्टीकचा वापर

भुसावळ : तालुक्यातील गोजोरा येथे गुरुवारी रात्री जुना वाद उफाळल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन एका गटातील 11 तर दुसर्‍या गटातील सहा जणांविरोधात दंगल, प्राणघातक हल्ला तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एका संशयीतास पोलिसांनी अटक केली असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बोलत नसल्याच्या कारणावरून हाणामारी : पहिल्या गटाची तक्रार
पहिल्या गटातर्फे लक्ष्मण बाळू सपकाळे (37, गोजोरा) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी जगन धर्मा कोळी (वराडसीम), सेवक उत्तम कोळी (भुसावळ), धीरज उत्तम कोळी (भुसावळ) व अन्य तीन अनोळखींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जगन कोळी यांनी फिर्यादी लक्ष्मण सपकाळे यांना तु माझ्याशी का बोलत नाही या कारणावरून वाद घातला व पाहून घेण्याची धमकी दिली तसेच गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या फिर्यादी हे पाहुणे मंडळींसह जेवण करीत असताना संशयीत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून घराचे गेट उघडून प्रवेश करीत हॉकी स्टीक तसेच स्टील रॉडने तक्रारदारास मारहाण केली तसेच एका संशयीताकडे पिस्टल असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

जुन्या वादातून मारहाण : दुसर्‍या गटाची तक्रार
दुसर्‍या गटातर्फे धीरज उत्तम कोळी (25, अयोध्या नगर,म्हाडा कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी लक्ष्मण बाळू सपकाळे (37, गोजोरा) व अन्य आठ ते 10 अनोळखींविरोधात तालुका पोलिसात दंगल व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या गटातील चौघे जखमी
तक्रारदाराचे चुलते जगन धर्मा कोळी व संशयीत लक्ष्मण बाळू सपकाळे (कोळी) यांच्यात गुरुवार, 26 रोजी रात्री आठ वाजता जुन्या वादातून झोंबाझोंबी सुरू असताना त्यांचे भाऊ व मित्राने वादात मध्यस्थी केल्याने सपकाळे घरी निघून गेले मात्र या वादाबाबत जगन कोळी, सेवक उत्तम कोळी, मित्र गौरव शिरूडे हे लक्ष्मण सपकाळे यांच्याकडे वादाची विचारणा करण्यासाठी गेले असता सपकाळे यांनी आरडा-ओरड केल्याने गर्दी जमा झाली व कोळी यांनी आपल्या हातातील रॉडने जगन धर्मा कोळी यांच्या डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झाले तर सपकाळे यांच्या घरातील अन्य आठ ते दहा सदस्यांनी लाठ्या-काठ्या व हाताने मारहाण करण्यास सुरूवात केल्याने या हल्ल्यात तक्रारदाराचे भाऊ सेवक उत्तम कोळी यांच्या हाताची दोन बोटे फ्रॅक्चर झाली तर गौरव शिरूडे व फिर्यादी धीरज उत्तम कोळी हे जखमी झाले. संशयीत लक्ष्मण बाळू सपकाळे (37, गोजोरा) यास अटक करण्यात आली. तपास नूतन पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.