एरंडोल: गुरांच्या गोठ्याच्या बिलावरून एरंडोल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.एस.अकलाडे व रवंजे खुर्द येथील माजी सरपंच विकास रोहिदास पाटील यांच्यात वाद झाला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी माजी सरपंच विकास पाटील यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडे तक्रार केली. शिवीगाळ व अरेरावी केल्याची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रवंजे खुर्दचे माजी सरपंच विकास पाटील यांच्या काकूंच्या नावावर असलेल्या रोजगार हमी योजनेतील गुरांच्या गोठ्याच्या फाईलवर सही घेण्याकरिता गट विकास अधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांनी इतर फायलींवर सह्या केल्या परंतु त्यांच्या फाइलवर सही केली नाही असे आरोप करण्यात आले आहे. याबाबत जाब विचारला असता त्यांनी फाईल विकास पाटील यांच्या अंगावर भिरकाहून दिली. कार्यालयातून बाहेर पडताना विकास पाटील यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली असा आरोप विकास पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. या कामाविषयी विकास पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्याशी फोनवरून दोनदा संपर्क करून तक्रार केली.