जळगाव। चाळीसगाव, पाळधी येथील सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याचे गोडावून फोडून 6 लाख रुपये किंमतीचा माल चोरून धुमाकुळ घालणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने चार संशयितांना अटक केली असून त्यांनी चाळीसगाव, पाळधी येथील गोडावून फोडल्याची कबूली दिली आहे. दरम्यान, संशयितांकडून 12 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चाळीसगावातील व्यावसायीक लक्ष्मण शंकर दुसे यांचे शहरातील फकीरा मार्केट परिसरातील हॉटेल कृष्णा जवळील गोडावून आहे. 10 जुलैच्या मध्यरात्री चोरट्यांनी गोडावून फोडून 1 लाख 23 हजार 500 रुपयांचा माल चोरून नेला होता. यानंतर दुसे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर चोरट्यांनी सात दिवसानंतर 18 जुलैच्या मध्यरात्री धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील लालचंद निळकंठ पाटील यांचे प्रणव ट्रेडर्स हे पान मसाल्याचे गोडावूनचे शटर तोडून 4 लाख 80 हजार रूपयांचा पान मसाल्याचा माल लंपास केला. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आठवड्याभरात दोन मोठ्या घटना घडल्याने व्यावयासिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरट्यांचा लवकरात लवकर तपास लागावा यासाठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह तसेच चाळीसगाव अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बछाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलिस निरिक्षक राजेशसिंह चंदेल यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, चोरट्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मालेगाव, भिवंडी तसेच औरंगाबाद व मध्यप्रदेश या ठिकाणी तपासासाठी पाठविण्यात आले.
अमळनेर शहरातून संशयितांना घेतले ताब्यात
मात्र, मंगळवारी मालेगाव शहरातील काही संशयित लोक हे अमळनेरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने अमळनेर शहर गाठत सर्च ऑपरेशन राबवून नदिम अहमद अब्दूल रशिद (वय-23 रा. गुलशन ए इब्राहिम कॉलनी, मालेगाव), शेख तौफिक उर्फ पापा शेख सुलेमान (वय-20 रा. लुमानीनगर, मालेगाव) या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. यानंतर त्यांना पथकाने खाक्या दाखवताच दोघांनी एक अल्पवयीन साथीदार व शब्बीर शेख शाबीर शेख (वय-19 रा. गुलशन गौर, मालेगाव) यांच्या मदतीने गोडावून फोडल्याची कबूली दिली. पथकाने लागलीच अल्पवीयन साथीदार व शेख शब्बीर याचा शोध घेत त्यांनाही अटक केली. यानंतर चौघांनी चाळीसगाव व पाळधी येथे केलेल्या चोरीची कबूली देत पाळधी येथील गोडावून मधील चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाला काढून दिला. पूढील कारवाईसाठी चौघांना धरणगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई ही पोनि. राजेशसिंह चंदेल यांच्या पथकातील पोहेकॉ. विजय पाटील, दिलीप येवले, शशिकांत पाटील, विनोद पाटील, रविंद्र पाटील, दिपक पाटील, संजय सपकाळे, संजय पाटील, शरिफ काझी, चंद्रकांत पाटील, अशोक चौधरी, रविद्र घुगे, युनूस शेख, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर, गफुर तडवी, इद्रीस पाटील अशांच्या पथकाने केली.