प्रेम मळलेल्या वाटेने न जाणारा, आपली वाट आपल्याच पायांनी मळणारा व वृत्तीतले कृतीत आणण्यासाठी सतत धडपडणारा माणूस म्हणजे दिलीप तिवारी. तिवारींची अन् माझी ओळख गेल्या नऊ-दहा वर्षांपासूनची. ही ओळख घट्ट व्हायला त्यांचे दखल हे पुस्तक कारणीभूत झाले, असो. नात्यागोत्यातले लोक म्हणजे गोतावळा. खरं पाहिलं तर हा गोतावळा, तोही आजच्या धावपळीच्या व संवाद नसलेल्या काळात वाढवणं, तो जपणं व वेळप्रसंगी त्या गोतावळ्यातील एकेकावर (कुठल्याही गोत्यात न शिरता!) स्पष्टपणे लिहिणं तसं कठीण असतं. आपणच परीक्षा घेत गुण न मिळवता पास-नापास होण्यासारखं असतं. पण त्या सर्व गोेष्टीची तमा न बाळगता वा पर्वा न करता तिवारींनी आपल्या गोतावळ्यातील अनेकांवर (त्यांच्या) वाढदिवसाच्या निमित्ताने लघु वा दीर्घ लिहिलं अन् गोतावळ्यातील प्रत्येकाचं त्याच्या गुणवैशिष्ट्यासह आपल्यासमोर ठेवलं. जे काम तसं म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण होतं. सच्चा मित्र तुझा जो आहे/ तोच तुझ्या मदतीला धावे/रडेल तो, तू जर का दु:खी/निजेल ना तो, तू तर जागा… मैत्रीची ही साधी व्याख्या समोर ठेवत सांगायचं तर तिवारींनी गोतावळ्यात ज्यांच्या-ज्यांच्याबद्दल लिहिलेय त्यांचे मी विश्लेषण करणार नाही वा समीक्षाही करणार नाही. पण तिवारींनी आपल्या लेखणीद्वारा गोतावळ्यातील प्रत्येकाची म्हणून जी जी वैशिष्ट्ये आहेत ती समजुतीने व श्रद्धेने लिहिलीय, हे मान्यच करावे लागेल. शेवटी हाती घेतलेलं काम तडीस जाईपर्यंत बेचैन राहणार्या तिवारींनी दूर उभे राहून जाणार्या-येणार्याकडे (डोळसपणे) पाहा! पण त्या ठिकाणी तटस्थ राहा! आणि एकरूप व्हा! असं सांगत जे लिखाण केलेय त्याचं आनंदानं स्वागत करू या!
थोडं पुढे सांगायचं, तर तिवारींच्या गोतावळ्यातील एकूणच लिखाणाला तसा घाट नाही व त्यात तोचतोपणा नाही. त्यातील सारी व्यक्तीचित्रे तशी रुढार्थाने व्यक्तिचित्रेही नाहीत. मुक्त आठवणींच्या स्वरूपात ती वाचकांसमोर येतात आणि त्या आठवणी, जशा संमिश्र आहेत तशा त्या एकमेकीत गुंतलेल्याही आहेत.तिवारींच्या लेखनामागची एक प्रबळ प्रेरणा म्हणजे त्यातून वाचकांशी झालेला संवाद, गप्पा मारण्याची हौस आणि भेटू या. या सर्व माणसांना ही तळमळ गोतावळ्याच्या निमित्ताने मी एक निरीक्षण मांडतो. होतय काय, आज संवाद नाही, आपुलकीची जागा दूरस्थपणाने आणि जिव्हाळ्याची भावना थंड उदासीनतेने घेतली आहे. हा फरक बरा की वाईट, तेही मला सांगता येणार नाही. पण या सर्व पार्श्वभूमीवर तिवारी जेव्हा गोतावळा नामक पुस्तक लिहितात तेव्हा ती गोष्ट आश्वासक व इतरांना लिहिती करणारी निश्चितच वाटते. अर्थात अजून एक गोष्ट, पूर्वीच्या त्या गुंतागुंतीच्या गोतावळ्यात सारेच काही आलबेल होते, असेही समजण्याचे कारण नाही. तिवारींना लिहीत राहा मित्रा… हे सलगीचे सांगणे व त्यासाठी खूपशा शुभेच्छा!
-चंद्रकांत भंडारी,जळगाव
9890476538