ठाणे । भिवंडीतील माणकोली परिरातील सागर कॉम्प्लेक्समधील चेक पॉईंट या कंपनीला बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. या आगीमुळे लगतच्या 16 गोदामांना आग लागली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निप्रतिबंधक साधने नसल्याने सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली. त्यातील प्लॅस्टिक आणि इतर साहित्याचा विषारी धूर यामुळे वातावरण प्रदूषित झाले. अग्निशमन दलांच्या अथक परिश्रमानंतर गुरुवारी आग अखेर आटोक्यात आली आहे. यात जीवितहानी झाली नाही. आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला होता. धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडथळा येत होता.
अग्निशमन दलांचे अथक परिश्रम
बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास माणकोली ओवली परिसरातील चेक पॉईंटच्या गोदामाला आग लागली. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण करत आजूबाजूच्या तब्बल 16 गोदामांना भक्ष्यस्थानी घेतले. अग्निशामक दलाच्या 200 टँकर पाणी आणि 60 ते 70 अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे येथून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. अखेर गुरुवारी अग्निशमन दलांच्या अथक परिश्रमानंतर आटोक्यात आणण्यात आली आहे.