कार, मद्यसाठ्यासह दोघे ताब्यात
जळगाव– लॉकडाऊन असल्याने इतर आस्थापणांसह दारु विक्री बंदचे आदेश आहे. या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे संबधित दारुची दुकाने तसेच गोदाम सील करण्यात आले आहे. हे सील उघडून सर्रासपणे दारु विक्री होत असल्याची तक्रार एका नागरिकाने पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली परिसरातील राज वाईन्सवर कारवाई करुन 1 लाख 10 हजार 54 रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू व बियरचा माल जप्त केला आहे.
नशिराबादच्या गोदामातून केला साठा जप्त
शहरातील अजिंठा चौफुलीवरील राज वाईन्सच्या नशीराबाद येथील गोडावूनचे सील उघडून तेथून दारु विक्री होत असल्याची तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्त्याने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे केली होती. तक्रारीनुसार कारवाईच्या सुचना डॉ. उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेला केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा लक्ष ठेवून होते. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना नशिराबाद येथील गोदामाचे सील उघडून कारने दारुचा साठा शहरातील अजिंठा चौफुलीवरील राज वाईन्सवर येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रोहम यांनी अशोक महाजन, सुनील दामोदरे, संजय हिवरकर, राजेश मेंढे रवींद्र घुगे , प्रमोद लाडवंजारी , किरण धनगर , दर्शन ढाकणे या पथकासह रविवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मद्याची वाहतूक करणार्या कारवर कारवाई केली. चौक शीत नशिराबाद येथील गोदामातून माल येत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने नशिराबाद गाठले. कारवाईत पथकाने कार तसेच गोदामातून 1 लाख 10 हजार 54 रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू व बियर असा मद्यसाठा जप्त केला.
संशयित दोघे ताब्यात
कारवाईत पोलिसांनी 2 लाख 50 हजार रुपये किंमतीची कार (नं एम. एच.18 डब्लू.9842) व 1 लाख 10 हजार 54 रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू व बियर साठा असा ऐवज जप्त केला आहे. तसेच संशयित नितीन श्यामराव महाजन (29 रा. अजिंठा हौसिंग सोसायटी, जळगाव) व नरेंद्र अशोक भावसार (33रा. अयोध्या गर) यांना ताब्यात घेतले आहे. उशीरापर्यंत पथकाची कारवाई सुरु होती.