भुसावळ- शहरातील गोदावरी नगर भागातील घराची लोखंडी जाळी तोडून भरदिवसा चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांपैकी एक महिला सात फूट उंच भिंतीवरून उडी टाकून पसार झाली होती तर दुसर्या एका महिलेस सतर्क नागरीकांनी पकडत शहर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना गुरूवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी ललिता संजय चौधरी (गोदावरी नगर, गणेश कॉलनी, प्लांट नंबर आठ, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार सावली उर्फ पूनम राजमाने कुहर (23, इंदौर विमानतळाजवळ, इंदौर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती. आरोपी महिलेला शुक्रवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 18 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयीत आरोपी सावलीने आपल्या एका महिला साथीदारासोबत 15 इंच लांबीच्या कटावने संजीव बोठे यांच्या घराची भिंत ओलांडून त्यांच्या घराची लोखंडी जाळी तोडून चोरीचा प्रयत्न केला मात्र याचवेळी ललिता चौधरी, मनीषा चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान नेमाडे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरोपी महिलेस पकडले तर तिची साथीदार भिंतीवरून उडी टाकून पसार झाली. दरम्यान, आरोपी सावलीस शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी जिल्हा कारागृहात रवाना केले. तपास शहर पोलिस ठाण्याच्या हवालदार आशा तडवी करीत आहेत.