नांदेड । गोेज्या गोदावरी नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. शहरातील सांडपाणी नाल्यांद्वारे नदीत मिसळू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात तसेच गोदावरी प्रदूषित केल्याबद्दल प्रसंगी महापालिकेवर कठोर कारवाईचे संकेतही यावेळी निर्देश पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांनी दिले. जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण तसेच जिल्हास्तरीय पर्यावरण समितीच्या कामकाजाबाबत श्री. कदम यांनी आढावा घेतला. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक झाली. बैठकीला आमदार सुभाष साबणे, आमदार हेमंत पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर भातलंवडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, पर्यावरण समितीचे सदस्य डॉ. अर्जुन भोसले, सुरेश जोंधळे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नामदेव दारसेवाड आदींची उपस्थिती होती.
घनकचर्याचे विल्हेवाट : जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठका नियमित होणे आवश्यक आहे असे सांगत समितीच्या अध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करण्यात यावा. गोदावरी नदी प्रदुषणाबाबत यापुर्वी मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीतील निर्देशांवर महापालिकेकडून कार्यवाही झाली नसल्याचे दिसते. गोदावरीत शहराचे सांडपाणी मिसळू नये यासाठी महापालिकेने शासन धोरणानुसार स्व:निधीतून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगळ्या तरतुदीची गरज नाही. हा खर्च पर्यावरण धोरणानुसार बंधनकारक आहे. घनकचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्पही पुन्हा कार्यान्वित करण्यात यावा.महापालिकेकडून सांडपाणी तसेच घनकचरा प्रक्रियेबाबत करण्यात येणार्या उपाय योजनांची माहिती घेतली. जिल्ह्यात सुरु असलेल्या स्टोन क्रशर, तसेच विविध उद्योगांकडून पर्यावरण रक्षणांच्या मानकांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, असेही निर्देशीत केले. चर्चेत आमदार सर्वश्री पाटील, साबणे आदींनी सहभाग घेतला. चर्चेत पर्यावरण संवर्धनाविषयी आढावा घेण्यात येऊन चर्चा करण्यात आली.
ना. कदम यांची भेट
प्रदुषणाचे प्रमाण वाढ चालले असल्याने नद्या दिवसेंदिवस प्रदुषीत होत आहे. गोवर्धनघाट, उर्वशीघाट येथे प्रत्यक्ष भेट देवून गोदावरी नदीत जाणार्या सांडपाण्याच्या ठिकाणाची पाहणी केली. सांडपाणी नदी मिसळू नये यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, यासाठी प्रसंगी कार्यवाहीत कुचराई करणार्या यंत्रणांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही दिले. तुप्पा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासही त्यांनी भेट दिली. तेथून उस्माननगर-शिरढोण-गळेगाव शिवारात वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवड मोहिमेत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी करण्यासाठी रामदास कदम यांनी भेट
दिली.