नवी दिल्ली-गुजरातमध्ये २००२ साली घडलेल्या गोध्रा हत्याकांडादरम्यान झालेल्या नरोडा पाटिया दंगलीतील चार दोषींची सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केली आहे. उमेशभाई भारवाड, राजकुमार, हर्षद आणि प्रकाशभाई राठोड अशी या चार दोषींची नावे आहेत.
नरोडा पाटिया प्रकरणी सुप्रीम कोर्टात न्या. ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने चार मुख्य दोषींना जामीन मंजूर केला. त्याचबरोबर खंडपीठाने म्हटले की, याप्रकरणी कोर्टात आणखी युक्तीवाद होण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. या सर्व दोषींना भादंवि ४३६ अंतर्गत (घर उध्वस्त करण्याच्या हेतूने आग लावणे अथवा स्फोट घडवून आणे) दोषी ठरवण्यात आले होते.
या प्रकरणी गेल्या वर्षी गुजरात हायकोर्टाने बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी याला दोषी ठरवले होते. मात्र, भाजपाच्या माजी मंत्री आणि या प्रकरणातील आरोपी माया कोडनानी यांची पुराव्याअभावी मुक्तता केली होती.
नरोडा पाटिया दंगल प्रकरण २००२ मधील गोध्रा हत्याकांडाशी जोडलेले आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली होती. या एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणावरुन अयोध्येतून कारसेवक अहमदाबादला जाण्यासाठी निघाले होते. यामध्ये ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने २८ फेब्रुवारी २००२ रोजी बंदचे आवाहन केले होते. याच दरम्यान नरोडा पाटिया भागात संतप्त जमावाने मुस्लिम समाजावर हल्ला करीत ९७ लोकांची हत्या केली होती.