गोध्रा हत्याकांडाप्रमाणे पुलवामातील हल्ल्यामागे भाजपचे षड्यंत्र; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप

0

नवी दिल्ली: गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामातला दहशतवादी हल्लादेखील भाजपाचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनी केला. पुलवामातल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नोंद गुजरातमध्ये करण्यात आली होती, असा दावादेखील त्यांनी केला. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून दहशतवादाचा आधार घेतला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

बालाकोटमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राइक भाजपाने अगदी नियोजितपणे केलेला हल्ला होता, असा दावा वाघेला यांनी केला. ‘बालाकोटवर करण्यात आलेल्या हल्ल्यात कोणीही मारलं गेलं नाही. एअर स्ट्राइकमध्ये 200 जण मारले गेले नाहीत, हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने सांगितलेले नाही,’ असे वाघेला म्हणाले. पुलवामा हल्ल्याची माहिती असूनही तो हल्ला होऊ दिला गेला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ‘गुप्तचर विभागाने पुलवामात हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र तरीही हल्ला रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली नाहीत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.