जळगाव । महाराष्ट्रलोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील घोटाळ्याचे काम मुंबई विशेष न्यायालयात सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने गोपाल दर्जी यांना एसीबी पथकाने मंगळवारी दुपारी अटक करून मुंबईला नेले होते. परंतू बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 1999 मध्ये झालेल्या परीक्षेच्या घोटाळ्याचे काम मुंबई विशेष न्यायालयात सुरू आहे. ही परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार सन 2002 मध्ये उघडकीस आला होता. याप्रकरणी 15 पेक्षा जास्त संंशयितांविरुध्द मुंबई एसीबीमध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयातील ए.डी. तनकीवाले यांच्या न्यायपीठात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीसाठी दर्जी हे वारंवार गैरहजर राहत होते. त्यामुळे न्यायालयाने या दर्जींविरूध्द अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. हे वॉरंट जळगाव एसीबीला मंगळवारीच प्राप्त झाले. त्यानंतर दुपारी वाजता जळगाव एसीबीचे डीवायएसपी पराग सोनवणे यांच्या पथकाने गोपाल दर्जी अटक करून त्यांना मुंबईकडे घेऊन रवाना झाल होते. बुधवारी त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यावर कामकाज होवून दर्जी यांना जामीन मंजूर करून त्यांची सुटका करण्यात आली आहे.