गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

0

पंढरपूर (विजय कुलकर्णी) : आम्ही जातो आमुच्या गावा | आमुचा रामराम घ्यावा ॥
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत आलेल्या संतांच्या पालख्यांसह लाखो भाविकांनी गोपाळपूर येथे गोपाळकाला केला. गोपाळकाला गोड झाला | गोपाळांनी गोड केला ॥ असे म्हणत लाखो भाविकांनी एकमेकाला काला देवून परतीचा मार्ग धरला.

आषाढी एकादशी सोहळा झाल्यानंतर पौर्णिमे दिवशी गोपाळपूर येथे संतांच्या पालख्या गोपाळकाला करतात. सकाळपासून गोपाळकाल्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे चार वाजल्यापासून पालख्या व दिंड्यांसह लाखो भाविक गोपाळकाल्यासाठी येत होते. मानाची पहिली हंडी चार्तुमासे महाराजांनी फोडल्यानंतर गोपाळकाल्यास सुरुवात झाली.
गोपाळ काला गोड झाला| गोपाळाने गोड केला ॥ यासह ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषाने गोपाळपूरनगरी दुमदुमली होती. येथील श्रीकृष्णाच्या गोपाळकाल्याला भागवत धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमा असल्याने प्रत्येक भाविक गोपाळपूरला येऊन गोपाळकृष्णाचे दर्शन व गोपाळकाल्याचा प्रसाद आवडीने घेत होते.

गोपाळपूर येथील गुरव समाज बांधवांच्या वतीने पहाटे चार वाजता श्रीकृष्णाची महापूजा करण्यात आली. यावेळी अंमळनेरकर महाराजासह संत गोरोबा, संत जनाबाई, संत सोपानकाका, संत नामदेव महाराज, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, संत नरहरी सोनार यांच्या पालख्यासह, दिंड्या गोपाळकाल्यासाठी गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना त्रास होवू नये म्हणून पंढरपूर-गोपाळपूर रस्ता बंद ठेवण्यात आला होता. श्रीकृष्ण मंदिरात गुरव समाजाच्यावतीने काल्याचे वाटप भाविकांना करण्यात आले.

गोपाळकाला झाल्यानंतर संतांचे पालखी सोहळे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत आले. याठिकाणी भोजन व दुपारचा विसावा घेतल्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळे परतीच्या दिशेने निघाले. यावेळी शहरवासीयांनी जड अंतःकरणाने माऊली व तुकोबारायांसह वारकरी, भाविकांना निरोप दिला.