वडगाव पोलिसांची वडगाव-तळेगाव चौकात कारवाई
नगरहून मुंबईकडे निघाला होता टेम्पो; तिघांविरोधात गुन्हा दाखल
वडगाव मावळ :नगरवरून मुंबईकडे गोमांस घेऊन जाणार्या टेम्पोवर छापा मारून सुमारे चार टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई वडगाव मावळ पोलिसांनी मंगळवारी (दि. 10) रात्री जुना पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव चौक येथे केली. कारवाईमध्ये एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर राजेद्र स्वामी (वय 25, रा. रेव्हेन्यु काँलनी शिवाजीनगर, पुणे) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयुर भारत वाघचौरे (वय 24, रा. बोथरा रोड, बसस्टँडजवळ, परांडा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), आसिफ आणि संतोष (पूर्ण नाव माहिती नाही) या तिघांविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रचला सापळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी यांना माहिती मिळाली की, अहमदनगर मधील कुरेशी हॉटेल येथून गाय व बैलाचे मांस एका टेम्पोमध्ये (एम एच 04 एच वाय 0153) भरून चाकण मार्गे मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्यात येत आहे. टेम्पोच्या मागच्या बाजूला लाकडी भुशाची पोती लावण्यात आल्याचेही समजले. यानंतर स्वामी यांनी त्यांचे मित्र मंगेश मच्छिंद्र नढे (वय 25, रा. नढेनगर, काळेवाडी), सनी हनुमंत येळवंडे (वय 25, रा. लक्ष्मी मंदीराजवळ, पाषाण), अमोल सुरेश पगडे (वय 30, रा. इंद्रायणी नगर, पगडे वाडा, वडगाव मावळ), संदेश भरत भेगडे (वय 29, रा. शेलारवाडी, देहुरोड) यांनी मिळून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव चौकात सापळा रचला.
बदली चालक, दोनवेळा फेर्या…
रात्री दहाच्या सुमरास वरील वर्णनाचा एक टेम्पो चौकात आला. त्या टेम्पोला अडवून बघितले असता, मागच्या बाजूला लाकडी भुशाची पोटी लावण्यात आली होती. पोटी बाजूला काढून बघितले असता, आतमध्ये निळ्या ताडपत्रीमध्ये गाय व बैलाचे मांस आढळून आले. वडगाव मावळ पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन टेम्पो व टेम्पोचालक मयूर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मयूर यांच्याकडे कसून चौकशी केली असता, माहिती समोर आली की, मयूर हा बदली चालक म्हणून काम करतो. मागील एक आठवड्यापासून संतोष याने त्याच्या टेम्पोवर त्याला बदली चालक म्हणून ठेवले आहे. अहमदनगर वरून मुंबई मधील मीरा रोड येथे आसिफ याला माल पोहोच करण्याच्या एका ट्रिपसाठी मयूरला दोन हजार रुपये मिळतात. आतापर्यंत त्याने दोन ट्रिप केल्या आहेत. नगर पुणे बायपास रोडवर संतोष त्याला टेम्पोमध्ये गोमांस भरून आणून देतो. तिथून तळेगाव-चाकण रोडवरील बंद पडलेल्या टोलनाक्यापर्यंत संतोष मयूर सोबत येतो. टोलनाक्यावर संतोष टेम्पोतून उतरतो. तिथे आसिफ त्याला त्याच्या चारचाकी कारमधून घेऊन जातो.
सात लाखाचे गोमांस जप्त
टेम्पोमध्ये 7 लाख 20 हजार रुपये किमतीचे सुमारे चार टन गोमांस आणि 5 लाख रुपये किमतीचा एक टेम्पो असा एकूण 12 लाख 20 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गोमांस विक्री करण्याचा कोणताही परवाना नसताना देखील गोमांस विक्री केल्याप्रकरणी टेम्पो चालक, मांस विक्रेता आणि खरेदी करणारा यांच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.