गोमाई नदीपात्रात डॅम बंधारे बांधकामाला सुरुवात

0

आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते आठ कोटींच्या बंधार्‍याच्या बांधकामाचे भूमीपूजन
असलोद:राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यामध्ये करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जलसंधारणाच्या उपाययोजना म्हणून फेजर गेट चेक डॅम बंधारे बांधकामास गोमाई नदीपात्रात सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यातील सातफेजर गेट चेक डॅम बंधार्‍याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते शुक्रवारी, 12 रोजी करण्यात आले.

7 ठिकाणी बंधारे बांधणार
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील गोमाई नदीपात्रातील मलोणी, लोणखेडा, भागापूर, गोगापूर क्रमांक एक व दोन जवखेडे श्री खेड या 7 ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाने आठ कोटी 19 लाख 30 हजार 103 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या बंधार्‍यामुळे शहादा शहरासह सात गावातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात उर्वरित 13 बंधार्‍यांचे बांंधकाम
दुसर्‍या टप्प्यात उर्वरित 13 बंधार्‍यांचे बांंधकाम करण्यात येणार आहे. हे वीस बंधारे पूर्ण क्षमतेने तयार झाल्यास यात निर्माण होणार्‍याा जलसाठ्यामुळे तालुक्यातील सुमारे 342 हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्षपणे ओलीताखाली येणार असल्याने त्याचा लाभ परिसरातील नागरिकांसह शेतकर्‍यांना होणार आहे. सुमारे पाच मीटर उंचीचे एकशे दहा मीटर लांबीचे हे बंधारे असणार असून यात साधारण नदीपात्रात सातशे सघमी(सहस्त्र घनमीटर) साठवण क्षमता असणार आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात पाचशे ते सातशे मीटरपर्यंत जलसाठा असणार आहे. पाणी अडविण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच प्लास्टिकच्या फळ्या वापरल्या जाणार आहेत. या बंधार्‍यामुळे पावसाळ्यात नदीला येणार्‍या पुराचे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य होणार आहे. उन्हाळ्यातही नदीपात्रात जलसाठा असणार असल्याने सिंचनाच्या दृष्टिकोनातून हे बंधारे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी आ.राजेश पाडवी यांच्यासह सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, जलसंधारण अधिकारी रमेश व्ही.गावित, उपविभागीय जलसंधारण अधिकारी निलेश एस. पाटील, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब यु. डोळस, तेजस के. राहाणे, राकेश एस. पावरा, गणेश पी. पाटील, क्षेत्रीय अभियंता शैलेश एस. अहिरे, पुष्पराज ए. पाटील, पंचायत समितीच्या सभापती बायजाबाई भिल, पं.स. सदस्य गणेश पाटील, डॉ.किशोर पाटील, सुनील चव्हाण, अविनाश मुसळदे, कृषीभूषण हिरालाल पाटील, अतुल जयस्वाल, योगेश पाटील, विरसिंग पाडवी, नारायण ठाकरे, डॉ.विजय चौधरी, गणेश पाटील, गोविंद पटले, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, निलेश मराठे, जयेश देसाई, कमलेश जांगिड, रमाशंकर माळी, वैभव सोनार, गुड्डू वळवी आदी उपस्थित होते.