गोरक्षकांची दंडेली बंद कधी होणार ?

0

अमेरिका, पोर्तुगाल आणि नेदरलँड्स या ठिकाणचा दौरा करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतले. नरेंद्र मोदी परतताच देशात चाललेल्या विविध घटनांनी अस्वस्थ झाले असे काही प्रसारमाध्यमांनी भासवले. कधी नव्हे ते मोदी आता कथित गोरक्षकांच्या चुकीच्या भूमिकेवर संतापले. झारखंड येथील रांची शहरापासून सुमारे 200 कि.मी. अंतरावर असलेल्या एका खेड्यात घराबाहेर गाईचे सांगाडे आढळल्याने उस्मान अन्सारी या नागरिकास जमावाने बेदम मारहाण करून त्याचे घर पेटवून दिले. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कायदा हातात घेतलेल्या गोरक्षकांना हिंसक घटना थांबवण्याचे आवाहन केल्याचे दिसते. गोरक्षक हिंदू संघटनांचे असताना त्यांच्याच नेत्यांना आवाहन करावे लागते आणि गोरक्षक ऐकत नाहीत, यातील मथितार्थ जनतेला कळत नाही असा नाही. गोरक्षक गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांना मारहाण करत असल्याचा प्रकार मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सुरू झाला आहे. तीन वर्षांपूर्वी मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले आणि गोवंश हत्याबंदीची सक्रिय चर्चा सुरू झाली. त्यानंतर कथित गोरक्षकांनी कायदा हातात घेत हिंसाचाराला प्रारंभ केला.

यावर केंद्र सरकारने सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे गोभक्तांना अधिकच चेव आला आणि अल्पसंख्याकांवर अधिक हल्ल्यांच्या घटना घडू लागल्या. झारखंड राज्यात नुकत्याच घडलेल्या घटनेत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर उस्मानचा मृत्यू अटळ होता, एवढी भयानक घटना घडली. मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर दिल्ली येथून जवळच असलेल्या दादरी येथे अखलाक या मुस्लीम समाजाच्या नागरिकाची घरात गोमांस बाळगल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली. उधमपूर येथे जहीद रसुल भट हा 16 वर्षांचा विद्यार्थी एका ट्रकमधून प्रवास करीत असता जमावाने सदर ट्रकमध्ये गोमांस व गाई असल्याच्या संशयामुळे ट्रकवर पेट्रोलबाँब फेकला. या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला. 21 दिवसांपूर्वी एक घटना दिल्ली-मथुरा रेल्वेगाडीत घडली. 15 वर्षांचा जुनेद खान हा मुलगा रमजान इदनिमित्त आपल्या गावी वल्लभगडला रेल्वेने जात असता एका टोळक्याने त्याची बीफ खाणारा म्हणून टिंगलटवाळी केली. यानंतर टवाळीचे रूपांतर विद्वेषात होऊन जुनेदला भोसकून ठार मारण्यात आले. केंद्र सरकार तथाकथित गोरक्षकांवर काबू ठेवू शकत नाही, असेच दिसते. मोदी परदेशवारी करून परतल्यानंतर दिल्लीजवळ साबरमती आश्रमात बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपले मौन सोडत गोरक्षकांनी सुरू ठेवलेल्या हिंसक घटनेबाबत गोरक्षकांना खडसावले. देशभर गोसंरक्षणाच्या नावाखाली घडत असलेला हिंसाचार सर्वथा अमान्य आहे. देशातील कोणत्याही नागरिकाला याबाबत कायदा हातात घेण्याची परवानगी नाही, असेही मोदी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही तथाकथित गोरक्षकांना समज दिली होती. त्यावेळी गोरक्षकांनी मोदींबाबत अनद्गार काढले होते, हे विशेष! मोदींनी आम्हाला अडथळा केला तर केंद्रातील सत्ता धोक्यात येईल, असा दम देण्यापर्यंत काही गोरक्षकांची मजल गेली होती. या तथाकथित गोरक्षकांना आवरणे काळाची गरज आहे. केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांसाठी कारभार पाहते. ते फक्त गोरक्षक व कट्टर हिंदुत्ववाद्यांसाठी चालत नाही. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हक्क व अधिकारात सर्वधर्मसमभाव नमूद केला आहे. त्याअन्वये सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे रीती-रिवाज, पोशाख, व्यवहार, खानपान करण्याचा मूलभूत अधिकार व हक्क भारतीय राज्यघटनेने दिला आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा व कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. केंद्र सरकारने अल्पसंख्याकांवर हल्ला करणार्‍या टोळभैरवांना काबूत ठेवले पाहिजे, अन्यथा अखंड भारतात धर्माधर्मांमध्ये तंटे उभे राहून देशातील एकसंधपणा नष्ट होण्याचा धोका भवितव्यात दिसत आहे तसेच याचे दूरगामी परिणाम भवितव्यातील राजकारणावर होणार असून केंद्र सरकारने वेळीच जागे होणे गरजेचे आहे.
अशोक सुतार – 8600316798