गोरक्षाच्या नावाखाली पुन्हा मारहाण

0

नवी दिल्ली : गोरक्षकांनी काश्मीरात नऊ वर्षांच्या मुलीसह तिच्या कुटूंबातील पाच जणांना अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण घडल्यानंतर काही तासातच पुन्हा दिल्लीमध्येही असाच प्रकार घडला आहे. गोरक्षाच्या नावाखाली दिल्लीच्या कालका परिसरात तीन मुस्लिम युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. हे युवक ट्रकमधून म्हशी घेऊन चालले होते. रस्त्यातच काही लोकांनी त्यांना आडवून मारहाण केली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री साडेअकरा वाजता म्हैशींची वाहतूक होत असल्याची सुचना मिळाली. ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा तीन युवकांना बेदम मारहाण सुरू होती. ट्रक व म्हैशी ताब्यात घेतल्या असून जखमी तीन युवकांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. म्हैशींची वाहतूक करणारे रिझवान, आशू आणि कामिल या तीन मुस्लिम युवकांना पीपल्स फॉर अ‍ॅनिमल नावाच्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी पकडले. पीडित युवकांचा आरोप आहे की, या संस्थेच्या सदस्यांनी त्यांना मारहाण केली. तर सामाजिक संस्थेने मारहाणीचा आरोप फेटाळला आहे. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करून कारवाई सुरू केली आहे.