गोरक्षेच्या नावावर हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही 

0

दिल्ली | सोमवारपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कथित गोरक्षकांनी देशभरात घातलेल्या धुमाकुळावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत कथित गोरक्षकांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या. त्यांनी जीएसटी यशस्वीपणे लागू करण्यासाठी सहकार्याबद्दल सर्व पक्षांचे आभारही मानले.

गोरक्षणाच्या मुद्द्याला धार्मिक स्वरुप देऊन राजकीय स्वार्थासाठी काही पक्षांकडून वापर केला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत या मुद्द्याला धार्मिक रंग न देण्याचे आवाहन मोदींनी केले. या बैठकीत आसाम, गुजरातसह देशातील काही भागात आलेल्या पुराबाबत चिंता व्यक्त केली गेली.

मोदी कोट गोमातेचे रक्षण व्हावे ही देशातील प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठी कायदा आहे. कायद्यानुसार कारवाई करा. कायदा-सुव्यवस्था राखणे ही राज्यांची जबाबदारी आहे. कुणी कायदा हातात घेत असेल तर ते खपवून घेऊ नका. कथित गोरक्षकांच्या हुल्लडबाजीचे राजकारण थांबावे यासाठी, राज्य सरकारांनी दक्षता बाळगावी. याला धार्मिक रंग न देता सर्वच पक्षांनी मिळून हे थांबवायला हवे.