नवी दिल्ली । गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील बालमृत्यूंमुळे प्रचंड खळबळ उडालेली असतांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अशा प्रकारच्या दुर्घटना होतच असतात असे वक्तव्य करून नवीन वादाला आमंत्रण दिले आहे. या असंवेदनशील वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
काय म्हणाले शहा ? शहा यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या देशात आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत, गोरखपूरमधील रूग्णालयात घडलेले मृत्यू ही काही पहिली मोठी दुर्घटना नाही. राजीनामे मागणं काँग्रेसचं काम आहे त्याप्रमाणे ते मागत आहेत असंही शहा यांनी स्पष्ट केलं आहे. तर या बालमृत्यूंमुळे जन्माष्टमी साजरी करावी की नाही? यावर भाष्य करतांना त्यांनी हा ज्याच्या-त्याच्या श्रध्देचा प्रश्न असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जन्माष्टमी साजरी करण्याचे निर्देश दिले असून यावरही टीका होत आहे.
एसआयटीची याचिका फेटाळली
दरम्यान, या घटनेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य न्यायाधीश जे एस शेखर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने घटनेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्या वकिलाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आपली तक्रार मांडण्यास सांगण्यात आलं आहे.