पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार पाहाता, शहरात जागेचे भाव सर्वसामान्यांच्या अवाक्यापलीकडे गेले आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत जमिनी बोगस गुंठेवारीच्या नावाखाली विकणार्या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या असून, त्यात महसूल प्रशासनाचे काही अधिकारी, महापालिकेतील अधिकारी व स्थानिक नगरसेवक व राजकीय नेते सहभागी आहेत. त्यामुळे बोगस सातबारा उतारे देऊन अनेक गोरगरिबांना फसविण्याचा धंदा खुलेआम सुरू असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल या धंद्यात होत आहे. एकच भूखंड अनेकांना विकला जात असल्याने हाणामारीच्या घटनाही घडत असून, अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. काही भूखंडमाफियांनी तर नदीच्या काठावर भराव टाकून तेथील भूखंडदेखील गुंठेवारीच्या नावाखाली विकण्याचा सपाटा लावला आहे. तहसील प्रशासनाचे बोगस सातबारे तर अनेक ठिकाणी पान टपर्यांवर मिळत आहेत. या धक्कादायक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी पुढे आली आहे.
गुंठेवारी, अवैध बांधकामांचा प्रश्न गंभीर
भोसरी, चर्होली, दिघी, मोशी, कृष्णानगर, संभाजीनगर, किवळे, मामुर्डी, वाल्हेकरवाडी, थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी या भागासह शहरातील गणेशनगर, कस्पटेवस्ती, चिंचवडेनगर, बिजलीनगर या भागात मोठ्या प्रमाणात बोगस गुंठेवारीचे पेव फुटले आहे. धक्कादायक बाब अशी, की चिंचवडेनगर, बिजलीनगर हा भाग प्राधिकरणाच्या अख्त्यारित येत असून, चिखली, दिघी, भोसरी या भाग रेडझोनमध्ये येतो. तरीही गुंठेवारीने प्लॉट पाडून ते बेकायदेशीर विकण्याचा गोरखधंदा काही टोळ्यांनी राजेरोस सुरू केलेला आहे. मध्यमवर्गीय व गोरगरिबांना हे भूखंड अत्यंत कमी किमतीत विकून त्यांची फसवणूक केली जात आहे. यापैकी काहींची नोंदही महापालिकेत करण्याचा उपद्व्याप या टोळ्या करत आहेत. गुंठेवारीने तेथे लोकवस्ती झाली की तेथील नागरिकांचा मतासाठी वापर व्हावा म्हणून काही नगरसेवक तेथे मूलभूत सोयीसुविधाही पुरवतात. त्यामुळे या भागातील अवैध बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. बोगस गुंठेवारीची प्रकरणे करणारी टोळी एकच भूखंड अनेकांना विकत असून, त्यांच्याकडून पैसे लाटत आहेत. तसेच, अगदी अनधिकृत जमिनींवर प्लॉट पाडून तेथील भूखंडही गुंठेवारीने विकले जात आहेत. त्यासाठी बोगस सातबारा उतारे, महसूलचे शिक्केदेखील या टोळक्यांकडे आहेत. त्यातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक गोरगरिबांची केली जात आहे.
अब्जावधी रुपयांची अवैध उलाढाल
सांगवी, नवी सांगवी, दापोडी, थेरगावसह तब्बल 14 गावांत बोगस गुंठेवारीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या भागातील विकासालाही मोठी खीळ बसली असून, स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुंठेवारीतून अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला असून, दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे वाढतच आहेत. विशेष म्हणजे, जमीन खरेदी करताना 10 हेक्टर जमिनीची सरकारची अट असताना, मध्यंतरी गुंठेवारी कायद्याची मुदत वाढविल्याचा गैरफायदा घेऊन काही टोळ्या एक गुंठे (10 मीटर)चा भूखंड अवैधपणे विकण्याचे काम करत आहेत. त्यातून पिंपरी-चिंचवड शहरात अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहितीही या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
अवैध बांधकामे व गुंठेवारीची आकडेवारी
31 मार्च 2008 पर्यंत 23890 घरे
31 मार्च 2012 पर्यंत 1,10,000 घरे
31 मार्च 2017 पर्यंत 1,75,000 पेक्षा जास्त घरे
नदीकाठी भराव टाकून प्लॉट पाडले
पवना नदीसह इंद्रायणी नदीकाठी काही जणांनी भराव टाकून प्लॉट पाडले असून, हे प्लॉट गुंठेवारीच्या नावाखाली विकले जात आहेत. 5 ते 20 लाखांपर्यंत या प्लॉटची विक्री होत असून, ही सर्व खरेदी-विक्री बेकायदेशीर आहे. अनेकांना बोगस सातबारा उतारे दिले जात आहेत. आरक्षित अथवा रस्त्यावर बांधकामे केली जात असल्याने त्याचा विकासकामांना मोठा फटका बसत आहे. नगरसेवक व अधिकार्यांच्या आशीर्वादाने काही टोळ्यात या धंद्यात कार्यरत झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत बोगस गुंठेवारीची सव्वा लाख बांधकामे वाढली आहेत, अशी माहितीही या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.