निर्णयाचा फेरविचार करण्याची माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी
सांगवी : महापालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या उरो रुग्णालय शाळा क्रमांक 100 बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शाळा एकत्रीकरणाचे कारण देत सोमवार (दि. 25 सप्टेंबर) पासून ही शाळा बंद होणार असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक धास्तावले आहेत. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने पूर्वसूचना देणे गरजेचे असताना तसे झालेले नाही. त्यामुळे शिक्षक व पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक सत्राच्या मध्यातच शाळा बंद होणार असल्याने गोरगरीब कुटुंबातील सुमारे 70 विद्यार्थ्यांना दुसरी शाळा शोधण्यासोबतच आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हा निर्णय दुर्दैवी असून, प्रशासनाने विद्यार्थीहित लक्षात घेऊन त्याबाबत फेरविचार केला पाहिजे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
अनेक वर्षांपासून सुरू आहे शाळा
नवी सांगवीत औंध उरो रुग्णालय महापालिका शाळा क्रमांक 100 गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्या या शाळेत गोरगरीब कुटुंबातील सुमारे 60 ते 70 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी पहिली ते सातवी इयत्तांमधील असून, ते गरीब कुटुंबातील आहेत. आता शाळा बंद होत असल्याने या विद्यार्थ्यांना अन्य शाळेत जुळवून घ्यावे लागणार आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अभ्यासक्रमही बहुतांश शिकवून झाला आहे. सर्वकाही सुरळीत असताना महापालिका शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांची चांगलीच कसरत होणार आहे.
बा. रा. घोलप शाळेत जा
या शाळेत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना नजीकच्या बा. रा. घोलप शाळेत जाण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, बा. रा. घोलप शाळेत हे 60 ते 70 विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहे. तिथल्या शिक्षकांवरही याचा ताण येणार आहे. या शाळेत वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याचे आव्हानही बा. रा. घोलप शाळेवर असणार आहे. शिवाय शैक्षणिक सत्र आता मध्यावर आल्यानंतर शाळा बदलणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत महापालिका शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
शाळा बंद होणार असल्याची माहिती होताच, पालक हादरले. काही पालकांनी लागलीच माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्याकडे धाव घेत हा विषय त्यांच्या कानावर घातला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती पालकांनी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने राजेंद्र जगताप यांनी पुढाकार घेत शाळा बंद करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली. अचानक शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जूनपूर्वीच का बंद केली नाही शाळा?
याबाबत राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, महापालिका शिक्षण मंडळाला शाळा बंद करायचीच होती, तर त्याचे आदेश जूनपूर्वीच देणे आवश्यक होते. येथील शाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचा व अविचारपूर्वक घेतलेला आहे. किमान चालू शैक्षणिक वर्षात तरी शाळा सुरू ठेवावी. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होणार आहे. बा. रा. घोलप शाळा या विद्यार्थ्यांना कसे अचानक सामावून घेणार आहे. तिथल्या व्यवस्थापनावर याचा ताण पडणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याचा गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.