पुणे । थोर समाज सुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा विपुल असून त्यांनी कामगार चळवळीतील त्यांचे कामही दखल घेण्याजोगे आहे. त्यांच्या फकीरा कादंबरीचा आजही साहित्य क्षेत्रात बोलबाला आहे. अनेक राष्ट्रीय पुरुषांच्या वास्तूंचे, त्यांच्या वेगवेगळ्या ठेव्यांचे जतन होत असताना या भाऊगर्दीत अण्णाभाऊंचे साहित्य, त्यांचे श्रमहारा क्रांतीचे विचार काही अंशी उपेक्षितच राहिले.
राष्ट्रीय पुरुषांना जातीत बंदिस्त करू नये अशी अपेक्षा सर्वच जण करतात मात्र तसे होताना दिसत मात्र नाही. याच पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंचे विचार त्यांचे कार्य जनसामान्यापर्यंत विशेषत: युवापिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत; असे भारिप बहुजन महासंघ युवा नेते नागेश भोसले, रिपब्लिकन मातंग सेनेचे अध्यक्ष अमोल तुजारे यांनी सांगितले. जनशक्तिच्या पुणे कार्यालयास या उभयतांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोघांनी पक्षाची राजकीय वाटचाल, त्याची सद्यस्थिती अण्णाभाऊंचे कार्य याविषयांवर मनसोक्त बातचीत केली. गोरेगावला अण्णाभाऊंचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे संघटनेच्या वतीने मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभा केला जाईल
भोसले म्हणाले, संशोधक तथा लेखक धर्मपाल कांबळे यांनी संशोधन करून ‘शोध अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात गोरेगाव येथील सिद्धार्थनगर रस्ता नं 17, बी40/159 ही वास्तू अण्णाभाऊ साठे यांना सरकारने खास विशेष बाब म्हणून दिल्याचे सिद्ध केले आहे. या दोन खोल्यांच्या घराचा ताबा कुमुदिनी कुलकर्णी यांच्याकडे आहे. सरकारने या ऐतिहासिक वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अण्णाभाऊ साठे यांच्या परिवाराचे पुनर्वसन करावे, अन्यथा संविधानिक अधिकाराने, लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभा केला जाईल.
महामंडळ कार्यान्वित करावे
राज्य सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पूर्णपणे कार्यान्वित करावे, असेही भोसले आणि तुजारे यांनी सांगितले. या मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यात बँकांचा अडसर येतो; तो दूर व्हावा असेही ते यावेळी म्हणाले. भारिप बहुजन महासंघाच्या कामाचीही माहिती त्यांनी दिली. आगामी काळात पक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने आणि संस्कारातून पुण्यातही आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.