मुंबई । गोलफादेवी, बालवीर, यंग प्रभादेवी, ओम् ज्ञानदीप संघांनी पिंपळेश्वर क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मॅटवर सुरू असलेल्या कुमार गटाच्या उद्घाटनीय सामन्यात गोलफादेवी संघाने विजय नवनाथ संघाचा 41-30असा पराभव केला. मध्यांतराला 18-14 अशी आघाडी घेणार्या गोलफादेवी संघाने उत्तरार्धात देखील तोच जोश कायम ठेवत हा विजय सोपा केला. शार्दुल हरचकर, सिद्धेश पिंगळे यांच्या धारदार चढाया आणि विष्णू लाड याचा भक्कम बचाव यामुळेच हे शक्य झाले. मयूरेश पांचाळ, हर्ष लाड यांचा खेळ विजय नवनाथ संघाला विजय मिळवून देण्यास कमी पडला. मध्यांतरातील 15-17अशा 2गुणांच्या पिछाडीवरून श्री गणेश संघाचा 36-28असा पराभव केला. किरण हर्णेकर, संजय सावंत यांच्या चतुरस्त्र खेळाने श्री गणेश संघाला 2 गुणांची आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते, पण ती त्यांना टिकविता आली नाही. उत्तरार्धात बालवीर संघाच्या प्रतीक आणि साहिल या राणे बंधूनी टॉप गीअर टाकून संघाला 8 गुणांनी विजय मिळवून दिला.