जळगाव। गोलाणी मार्केट व परिसरात प्रचंड अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने आयुक्त, महापौर, आरोग्य अधिकारी यांनी वारंवार सुचना, नोटीसा देऊनसुद्धा स्वच्छतेचा प्रश्न सुटत नसल्याने आणि शरद जगन्नाथ काळे यांनी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीवरुन काल 16 रोजी सकाळी प्रांतधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, आयुक्त यांच्या पाहणीनंतर स्वच्छता होत नसल्यामुळे तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आणि फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 133 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.
10 दिवसात स्वच्छतेचे टेंडर…
या आदेशाने गाळेधारक खडबडून जागे होऊन रविवारी 16 रोजी 11 वाजता गोलाणी परिसरात चर्चा करुन जिल्हाधिकारी, महापौर यांच्या संमतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्याबैठकीत स्वच्छतेसाठी स्वतंत्र खाते उघडण्यात येऊन प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यासाठी गाळेधारकांनी 1100 रुपये जमा करण्यास मान्यता दिली. 8 ते 10 दिवसात स्वच्छतेचे टेंडर काढण्यात येईल त्यानंतर पुढील खर्चाचे अंदाज देण्यात येणार असून गाळे बंदचे आदेश मागे घेतल्याचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले.
सोसायटी स्थापन करा
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले की, गाळे व परिसर स्वच्छता ठेवणे गाळेधारकाची जबाबदारी आहे, मी दोन वेळेस भेट दिली परंतु मला अस्वच्छता दिसून आली. गाळे हे मनपाने व्यापारासाठी दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही सोसायटी स्थापन करुन स्वच्छतेचा प्रश्न सोडवावा असे गाळेधारकांना सांगण्यात आले. या बैठकीत श्री. निंबाळकर यांनी व्यापार्यांच्या शिष्टमंडळास सुरूवातीला स्वच्छता त्यांनाच करावी लागणार असल्याची जाणीव करून दिली. तसेच गोलाणी मार्केटमधील व्यापार्यांना स्वच्छेतेची नोटीस बजावूनही स्वच्छता राखली नसल्याने नाराजी व्यक्त केली. शिष्टमंडळाला मार्केटमध्ये स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक गाळेधारकाने प्रत्येक महिन्याला 500 रूपयांप्रमाणे तीन महिन्यांसाठी जमा करण्याचा प्रस्ताव मांडून या पैशातून गोलाणी मार्केटची सफाई करण्यात येणार असल्याचे श्री. निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाला व्यापार्यांनी विरोध करीत पूर्वी 100 रूपयांचीच आकारणी केली जात असल्याचे श्री. निंबाळकर यांच्या निर्देशनास आणून दिले. यावेळी श्री. निबांळकर यांनी व्यापार्यांनीच 100-100 रूपये जमाकरून स्वच्छता करून घेण्याचा सल्ला दिला. यावेळी यात हस्तक्षेप करीत महापौर नितीन लढ्ढा यांनी 100 रूपये आकारणे हे योग्य आहे का? अशी विचारणा व्यापार्यांना केली. इतक्या कमी पैशांत सफाई कशी होईल अशी विचारणा श्री. निंबाळकर यांनी केली. यावेळी मंगला बारी यांनी महिन्याला 300 रूपये घेण्याची विनंती केली. तुम्हला चेअरमन करतो तुम्हीच यातून खर्च करा असा उपरोधीक टोला श्री. निंबाळकर यांनी लगावला.
मध्यम मार्गाची विनंती
शिष्टमंडळाने यातून मध्यम मार्ग काढण्याची विनंती प्रभारी आयुक्त निंबाळकर यांना केली. श्री. निंबाळकर यांनी निविदा प्रक्रीयेकरून मक्तेदारामार्फेत मार्केटची सफाईचा दुसरा प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवला. निविदा प्रक्रीयेच्या बोलीतून आलेली रक्कम व्यापार्यांनी अदा करावी असा प्रस्ताव ठेवला. या प्रक्रीयेसाठी तीन महिने लागणार असल्याचे शिष्टमंडळला सांगितले. महापौर लढ्ढा यांनी याप्रक्रीयेतून समाधानकारक सुविधा मिळत असतील तर निविदा प्रक्रीया राबविण्यास हरकत नसल्याचे मत नोंदविले. निविदा काढल्यानंतर मक्तेदाराला काम करणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्वच्छतेसंदर्भात प्रत्येक गाळेधारकांने प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यासाठी 1100 रुपये जमा करावे ते तुमच्या स्वतंत्र खाते काढून त्यात ठेवले जाईल. आणि त्यातून तीन महिन्याला स्वच्छतेसाठी खर्च केला जाईल. त्यानंतर टेंडरद्वारे एखाद्या चांगल्या यंत्रसांमुग्री असलेल्या ठेकेदारास ठेका देण्यात येईल. तीन महिने प्रायोगिक तत्वावर कामकाज पाहिल्यानंतर खर्चाची व टेंडर देण्याचा विचार केला जाईल. त्यानुसार सुरक्षा रक्षक,रंगरंगोटी, शौचालय, लिफ्ट, पीण्याचा पाणीपुरवठा, वीज अशा सुविधादेखील देण्यात येतील. तसेच आजपासुनच गोलाणी संकुलच्या गच्चीवर प्रवेश बंद करण्यात आला असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
गाळेधारकांचे निवेदन
जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी केलेल्या पाहणीअंती गोलाणी मार्केट बंदच्या आदेश उठविण्यासंदर्भात आणि स्वच्छतेची जबाबदारी मनपाने स्वीकारुन येणारा खर्च गाळेधारक देण्यार असल्यासंबंधीचे निवेदन सर्व गाळेधारकांनी आज जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांना देण्यात आले.